सजवलेली कार, वाद्यवृंदाच्या तालावर मिरवणूक; रत्नागिरीत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा दणक्यात
By मेहरून नाकाडे | Published: June 16, 2023 01:51 PM2023-06-16T13:51:39+5:302023-06-16T14:01:47+5:30
शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईंट
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक सत्र गुरूवारी (दि.१५ जून) सर्वत्र एकाच दिवशी सुरू झाले. नवागतांचे स्वागत दणक्यात करण्यात आले. शासन आदेशानुसार स्वागतासाठी शिक्षकांनीही नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या. जेणेकरून विद्यार्थ्यांना शालेय परिसर व वातावरण आनंदायी वाटावे यासाठी प्रयत्न करण्यात आला. गुहागर तालुक्यातील कोसबी शाळेत तर विद्यार्थ्यांना १७ लाखाच्या चारचाकीतून आणण्यात आले.
शासनाच्या अध्यादेशानुसार जिल्ह्यात पहिलीतील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा वेगवेगळ्या पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. कोसबी शाळेचे मुख्याध्यापक संतोष रावणंग व त्यांच्या सहकारी शिक्षक विजय शितप यांनी तर नवागतांच्या स्वागतासाठी चक्क १७ लाखाची चारचाकी आणली होती. कारसुध्दा फुगे लावून सुशोभित करण्यात आली होती. वाद्यवृंदाच्या तालावर विद्यार्थ्यांची कारमधून शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत पालकही सहभागी झाले होते.
विद्यार्थी शाळेत आलेनंतर त्यांचे आैक्षण करून त्यांना फूल व पेढा देत स्वागत करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला होता. सेल्फी पाॅईंटमध्ये विद्यार्थ्यांना उभे ठेवून त्यांचे फोटाेही काढण्यात आले. आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याबद्दल मुख्याध्यापक रावणंग व सहकारी शिक्षक शितप यांचे काैतुक करण्यात येत आहे.