वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरची धडक; बांदा येथील अपघातात रत्नागिरीतील ९ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:03 PM2024-05-13T12:03:19+5:302024-05-13T12:03:33+5:30
रत्नागिरी वरवडे येथून देवदर्शनासाठी गेले होते गोव्यात
बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा स्मशानभूमी समोर वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हलर समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. यात टेम्पो ट्रॅव्हलरमधील ९ प्रवासी जखमी झाले. अवकाळी पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवासी गाडीतच होते. मात्र, स्थानिकांनी स्वतःच्या वाहनाने सर्व जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल केले. हा अपघात शनिवारी सायंकाळी उशिरा घडला.
रत्नागिरी वरवडे येथील पिरणकर व आढाव परिवार देवदर्शनासाठी गोवा येथे टेम्पो ट्रॅव्हलरने गेले होते. देवदर्शन आटोपून माघारी रत्नागिरी येथे परतत असताना बांदा स्मशानभूमी येथे महामार्गावर वाहतूककोंडी असल्याने टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने गाडी थांबविली. दरम्यान, त्याचवेळी गोव्यातून कुडाळच्या दिशेने जाणारा डंपर आला असता पाऊस असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून डंपरने ट्रॅव्हलरला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की ट्रॅव्हलरसमोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. दरम्यान, डंपर चालकाने प्रसंगावधान राखून डंपर दुभाजकावर घातल्याने ट्रॅव्हलरची मोठी हानी झाली नाही. मात्र मागच्या भागाचे व दर्शनीभागाचे नुकसान झाले.
या अपघातात सिद्धीका प्रजय आढाव (१५), पलक प्रशांत आढाव (१४), प्रतिभा प्रकाश आढाव, स्वरा महेश पिळणकर (१४), समृद्धी प्रजय आढाव (१८), तेजल महेश पिरणकर (२३), हर्षदा महेश पिरणकर, प्रकाश लक्ष्मण आढाव, महेश मारुती आढाव (३५) यांना दुखापत झाली. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.