निवळी येथून चाेरीला गेलेला डम्पर सापडला कर्नाटकात
By अरुण आडिवरेकर | Published: May 22, 2023 09:04 PM2023-05-22T21:04:55+5:302023-05-22T21:05:10+5:30
या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील इसार पेट्राेलपंप येथून टाटा कंपनीचा १० चाकी डम्पर चाेरीला गेला हाेता. ही घटना १४ मे राेजी रात्री ८:३० ते १५ मे राेजी सकाळी ७ वाजतादरम्यान घडली. या चाेरीचा पाेलिसांनी छडा लावला असून, हा डम्पर कर्नाटक येथून हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या चाेरीप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे (२२, रा. चवरे वस्ती, पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे (दोघेही रा. पेनुर, ता. मोहळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. निवळी येथील इसार पेट्राेलपंप येथून टाटा कंपनीचा १० चाकी डम्पर (एमएच ०८ - एपी २७६४) हा चोरट्याने चोरून नेला हाेता. या चाेरीची नाेंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली हाेती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू हाेता. या गुन्ह्यातील संशयित आराेपी लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे याला २२ मे रोजी गाणगापूर (ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेला डम्पर, चाेरीसाठी वापरलेली कार व इतर साहित्य असा एकूण २८,६३,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लक्ष्मण ऊर्फ बाळू नामदेव चवरे याच्याकडे अधिक चाैकशी केली असता गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे हे दाेघे सोबत असल्याची माहिती त्याने दिली आहे. या दाेघांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. हे दाेघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. या तिघांसह जप्त केलेला माल रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहायक पाेलिस फाैजदार संजय कांबळे, पाेलिस हेड काॅन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर व पाेलिस काॅन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.