Ratnagiri: लोटेतील आरोमा कंपनीत आग लागून वायुगळती, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By अरुण आडिवरेकर | Published: May 5, 2023 05:18 PM2023-05-05T17:18:58+5:302023-05-05T17:19:20+5:30
चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली
सुनील आंब्रे
आवाशी : चिलिंग प्लॅन्टला प्रक्रिया करताना पाण्याची कमतरता भासल्याने तापमानात वाढ होऊन रियक्टरला आग लागून वायुगळती झाली. ही घटना खेड तालुक्यातील घटना लोटे औद्योगिक वसाहतीतील आरोमा कंपनीत शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी ११:३० वाजता घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली हाेती. सुदैवाने यामध्ये काेणीही जखमी झालेले नाही.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील इतर कंपनीचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करण्याचे काम आरोमा कंपनी करते. कंपनीत शुक्रवारी सकाळी चिलिंग प्लॅन्टला प्रक्रिया करण्याचे काम सुरू हाेते. यावेळी कंपनीत मालकांसह चार कामगार हाेते. चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली. त्यामुळे धुराचे प्रचंड लोळ हवेत उसळले.
दरम्यान, याचवेळी वायुगळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले हाेते. आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलासह खेड व चिपळूण नगरपालिकाचे अग्निशमन दलाला बाेलावण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये काेणतीही दुर्घटना झालेली नसल्याने साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वसाहतीतील अनेक कारखानदारांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी धाव घेतली. तसेच खेड व लोटे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. त्यांच्याकडून पंचनाम्याचे काम सुरु हाेते.