Ratnagiri Crime: मूल होत नाही म्हणून हिणवलं; रागातून केला चिमुकलीचा खून, घरातच पुरला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:09 IST2025-03-10T17:08:39+5:302025-03-10T17:09:15+5:30
रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणवल्याच्या रागातून रत्नागिरीतील चार वर्षांच्या अमैरा ज्युडान अन्वारी या चिमुकलीचा पाण्यात बुडवून खून ...

Ratnagiri Crime: मूल होत नाही म्हणून हिणवलं; रागातून केला चिमुकलीचा खून, घरातच पुरला मृतदेह
रत्नागिरी : मूल होत नाही म्हणून हिणवल्याच्या रागातून रत्नागिरीतील चार वर्षांच्या अमैरा ज्युडान अन्वारी या चिमुकलीचा पाण्यात बुडवून खून करून मृतदेह घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (६ मार्च) उघड झाला आहे. कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा प्रकार घडला. ही चिमुकली रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील राहणारी आहे. या प्रकरणी गोवापोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.
बाबासाहेब ऊर्फ पप्पू अल्लाट (५३) आणि पत्नी पूजा अल्लाट (३९, रा. फोंडा) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहे. कसलये-तिस्क येथील अमैरा अन्वारी ही चिमुकली सकाळपासून बेपत्ता होती. या संबंधी फोंडा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली हाेती. तिच्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अल्लाट कुटुंबीयाच्या घरी ये-जा करत होती. त्यामुळे पोलिसांनी दाेघांकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीला आला.
अमैराची आई पूजाला मूल नसल्याने वांझ म्हणून हिणवत होती. त्यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले हाेते. पूजाच्या डोक्यात हा राग खदखदत होता. तिने पती बाबासाहेब याच्या मदतीने त्या चिमुकलीला पळवून नेऊन तिचा कायमचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
चाॅकलेटच्या बहाण्याने पळविले
अमैरा बाहेर बागडत असताना तिला या दोघांनी चाॅकलेटचे आमिष दाखवून पळवून टबमध्ये बुडवून ठार मारले. तिला बाहेर कुठेतरी पुरून टाकण्याच्या त्यांचा प्रयत्न होता. मात्र, तोपर्यंत ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल झाली हाेती. पोलिस तपासकामासाठी त्या मुलीच्या घराजवळ आले होते. आपले बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्या चिमुकलीला घरातच खड्डा खोदून पुरले होते.
कौटुंबिक वादामुळे गोव्यात
अमैरा ही रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील राहणारी आहे. मात्र, कौटुंबिक कारणावरून अमैरा ही तिची आई आणि बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होत्या.
नरबळी दिल्याचा आईचा आराेप
अल्लाट दाम्पत्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आपल्या मुलीचा नरबळी दिल्याचा आराेप अमैराची आई बाबीजान यांनी केला आहे. या प्रकरणाचा याेग्य तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.