शिवराज्याभिषेकाप्रसंगी जयजयकाराने आसमंत दुमदुमला, रत्नागिरीत महासंस्कृतीत महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
By शोभना कांबळे | Published: February 15, 2024 01:01 PM2024-02-15T13:01:56+5:302024-02-15T13:03:17+5:30
रत्नागिरी : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या निर्माता रत्नकांत जगताप यांच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने ...
रत्नागिरी : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या निर्माता रत्नकांत जगताप यांच्या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. या कार्यक्रमातील शिवराज्यभिषेक प्रसंगाने उपस्थितीत रसिक भारावून गेले. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयजयकाराने सारा आसमंत दुमदुमला.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात बुधवारी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निलांबरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
स्थानिक कलाकार सुनिल बेंडखळे आणि राजेश चव्हाण यांनी सादर केलेला ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ हा संगमेश्वरी बोलीच्या कार्यक्रमाने उपस्थितांचे मनोरंजन केले. यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दमदार गणेश नमनाने झाली. या कार्यक्रमात सादर झालेल्या ‘बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल’, ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा गीतांमधून साकारलेल्या पंढरीच्या वारीने रसिकांनाही वारकरी बनविले. ‘झूंजूमुंजू पहाट झाली’, ‘नभं उतरु आलं..चिंबं थरथरवलं’ अशा उत्तमोत्तम गीतांमधून कृषीप्रधान भारताच्या हिरवाईचा साज साकारत होता. ठाकरं गीत, कोळी गीत आणि लावणी नृत्यातील अदाकारीने काही क्षण प्रेक्षकांना घायाळ केले.
रोमांचकारी पालखी नृत्य..
नाचणे येथील नवलाई ग्रुपच्या सदस्यांनी प्रेक्षकांमधूनच ढोल, ताशांचा निनाद करत, रंगमंचावर पालखी आणली. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात हे पालखी नृत्य त्यांनी सादर केले. यामध्ये विशेषत: मुलांनी उभा केलेला मनोरा, डोक्यावर फिरवलेली पालखी, उभ्या केलेल्या मनोऱ्यावर उचललेली पालखी, परातीच्या काठावर उभे राहून डोक्यावर तोललेली पालखी असे अनेक चित्तथरारक साहसी प्रकारांनी अंगावर रोमांच उभे केले.
लोकधाराच्या मंचावर भव्य दिव्य नेपथ्याच्या सहाय्याने मोठ्या संख्येतील कलाकारांनी’आई अंबे.. जगदंबे’ या गोंधळ नृत्याविष्कार टाळ्यांचा कडकडाटात सादर झाला. पारंपरिक गीतांना नव्या पिढीतील गितांची जोड देत, युवा रसिकांसाठी डीजे मधील काही नृत्य सादर केले.
कार्यक्रम समारोपाकडे जात असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग कलाकारांनी जोशपूर्ण गितांनी आणि नाट्याने जिवंत केला. छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांसह प्रेक्षकांसमोरुन रंगमंचावर पदार्पण करतात. सनई-चौघड्यांच्या मंगलमयी सुरात, तुतारी स्वरात सिंहासनाधिश्वर होतात. या प्रसंगाने मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षकघरी परतताना भारावलेले होते.