Ratnagiri: जयगड खाडीत लवकरच केरळच्या धर्तीवर हाऊसबोट प्रकल्प, पहिली चाचणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 06:16 PM2024-12-09T18:16:39+5:302024-12-09T18:17:08+5:30
कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण पर्यटकांना पाहायला मिळणार
रत्नागिरी : पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळच्या धर्तीवर रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीत हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची हाऊसबोट आणली गेली असून, तिची चाचणी घेण्यात आली. या बाेटीतून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी सैर केली. लवकरच ही बाेट कार्यरत हाेणार आहे.
उमेद प्रकल्पांतर्गत महिला बचतगटाच्या माध्यमातून हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार आहे. येथील कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण परजिल्ह्यांतील पर्यटकांना पाहायला मिळणार असून, याद्वारे रोजगारही मिळणार आहे.
हाऊसबोट प्रकल्पासाठी चार दिवसांपूर्वी एक बोट जयगड येथील खाडीत दाखल झाली आहे. ही बोट कोतवडे प्रभाग संघाला चालवण्यासाठी दिली आहे. जयगड खाडीतील सैतवडे व राई या परिसरातील पहिला प्रकल्प येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्याची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे.
कीर्ती किरण पुजार यांनी सैतवडे ते राई अशी बोटीमधून फेरी मारली. यावेळी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयाज पीरजादे, जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर, अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकर उपस्थित होते. पुढील आठ दिवसांत उर्वरित चाचण्या घेतल्यानंतर ही बोट कार्यान्वित हाेणार आहे.
पाच प्रभागसंघांना प्रत्येकी १ कोटी
मुंबईमधून पाच बोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. जलपर्यटनावर आधारित व्यवसाय उभे राहावेत, अशी संकल्पना कीर्ती किरण पुजार यांनी मांडली होती. त्यासाठी ‘उमेद’च्या महिलांना प्रशिक्षणही दिले गेले. सिंधुरत्न समृद्धी योजनेतून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील पाच प्रभाग संघांना प्रत्येकी १ कोटीप्रमाणे त्याचे वितरण केले गेले आहे.
जयगड खाडीत एक हाऊसबोट आली असून, ती पुढील काही दिवसांत प्रत्यक्षात पर्यटकांना फिरवण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. – कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.