पतीने पत्नी अन् मुलाचा केला निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने रत्नागिरी जिल्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:35 AM2023-08-04T11:35:35+5:302023-08-04T11:37:16+5:30
संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले
लांजा : पत्नी व सहा वर्षाच्या मुलाचा निर्दयीपणे खून करून पती पळून गेल्याची घटना गुरुवारी सकाळी लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे उघड झाली. या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संदेश चांदिवडे असे या संशयिताचे नाव आहे. त्याने आपल्या पत्नीला कोयतीने तर मुलाला उशी नाकावर दाबून मारल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले.
कोट पाष्टेवाडी येथे संदेश रघुनाथ चांदिवडे याचा विवाह सांगली येथील सोनाली हिच्याबरोबर सन २०१६ मध्ये झाला होता. संदेश गावागावांत जाऊन विद्युत मीटरचे रिडिंग घेण्याचे काम करतो. या जोडप्याला प्रणव (६ वर्षे) आणि पीयूष (३) अशी दोन आहेत. हे कुटुंब लांजा डाफळेवाडी येथे भाड्याच्या जागेत राहत होते. दि. १९ जुलैला सोनाली घरातून निघून गेली होती. संदेशने ती बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलिस स्थानकात दिली. दि. २९ जुलैला ती सापडल्यानंतर संदेश तिला व दोन मुलांना घेऊन कोट पाष्टेवाडी येथे आपल्या घरी राहण्यासाठी गेला.
बुधवारी रात्री जेवण झल्यानंतर प्रणव आई-वडिलांसोबत तर धाकटा पीयूष आजी लक्ष्मीजवळ हॉलमध्ये झोपला. सकाळी लक्ष्मी चांदिवडे जाग्या झाल्या, तेव्हा संदेश खोलीत दिसला नाही. नातू प्रणवला अंथरुणातून उचलून त्यांनी हॉलमध्ये आणून झोपवले. मात्र घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना आपली सून सोनाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले.
पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलिस स्थानकाचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, प्रवीण देसाई, हेडकॉन्टेबल अरविंद कांबळे, भालचंद्र रेवणे, सचिन भुजबळराव, राजेंद्र कांबळे, तेजस मोरे, प्रिया कांबळे, बाबूराव काटे, जितेंद्र कदम, नितीन पवार, चेतन घडशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी तेथे भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
भांडण झाल्याचा अंदाज
पहाटे पती-पत्नीचे भांडण झाले असावे. त्यातून संदेशने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रणवचा मृत्यू गुदमरून झाला आहे. संदेशने तोंडावर उशी दाबून त्याला मारले असावे आणि सोनाली बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिच्या मानेवर कोयती मारली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोनालीची मान अर्धवट तुटल्यासारखी झाली होती.
संदेश गेला पळून
हा प्रकार झाल्यापासून संदेश चांदिवडे पळून गेला आहे. त्यामुळे त्यानेच हे दोन्ही खून केले असल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. श्वानपथकही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. संशयित पतीला पोलिसांनी लांजातील चिरेखाणीत रात्री उशिरा पकडले.