चिपळुणातील महामार्गावर उभे राहतेय ‘जंक्शन’, गुंतागुंतीची वाहतूक सुटसुटीत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 06:08 PM2023-08-14T18:08:47+5:302023-08-14T18:09:27+5:30
गणेशोत्सवामुळे घाई
चिपळूण : गेले कित्येक दिवस रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाग पॉवर हाऊस नाक्यातील चौपदरीकरणाचे काम पावसाचा जोर कमी होताच पुन्हा सुरू झाले आहे. चिपळूण शहरात येणाऱ्या वाहनांसाठी येथे ‘जंक्शन’ उभारण्यात येणार आहे. काँक्रिटीकरणानंतर पॉवर हाऊस येथील गुंतागुंतीची वाहतूक काहीशी सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे.
महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजीनगरपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलच्या इथे उतरणार आहे. तर पाग परिसरातही गेल्या काही महिन्यांपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या येण्या-जाण्याचा आणि रस्ता ओलांडण्याचा प्रश्न सुटावा यासाठी अखेर येथे जंक्शन उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पावसाचा जोर कमी झाल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवामुळे घाई
गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलेला असल्याने येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चौपदरीकरणातील गुंतागुंत आणि अडचणीत राहिलेली कामे प्राधान्याने हाती घेतली जात आहे. त्यामध्ये पॉवर हाऊस येथील शिल्लक राहिलेल्या चौपदरीकरणातील काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू केले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्णत्वास जाऊन येथे चारही लेन सुरू केल्या जातील, असा विश्वास ठेकेदार कंपनीने व्यक्त केला आहे.
विरोधामुळे पेच
प्रांताधिकारी कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय, पाग बौद्ध कॉलनी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पागझरी हायस्कूल, कास्करआळी, गोरिवलेआळी, पाग मराठी शाळा, उघडा मारुती मंदिर परिसर, गोपाळकृष्णवाडी, जोशीआळी, रानडेआळी, मिरगलआळी, पॉवर हाऊस, गुहागर बायपास, पागनाका, पागमळा या वर्दळीच्या ठिकाणांचा विचार करताना पाग पॉवर हाऊस येथे अंडरपास मंजूर होता. मात्र, विरोधामुळे तो रद्द करण्यात आला. त्यानंतर येथे उड्डाणपुलासाठीही प्रयत्न झाला. मात्र, त्यासही विरोध झाल्याने प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग पेचात पडले होते.