कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, काम देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला
By मनोज मुळ्ये | Published: November 30, 2023 05:10 PM2023-11-30T17:10:09+5:302023-11-30T17:18:17+5:30
..त्यांचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही
रत्नागिरी : कोकणी माणसाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम केले. शिवसेनेवर प्रेम केले. पण, शिवसेनेने कोकणी माणसाला काय दिले? विकासाचे प्रकल्प आल्यावर विरोध केला जातो. ज्यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले, ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केले, त्यांचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही. त्याची फसगत करणार नाही. त्याला वापरून घेणार नाही. त्याच्या हाताला काम देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
रत्नागिरी दाैऱ्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोकणाचा विकास झाला तर येथील तरुण मुलांना आपले घर सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपण छोटे-छोटे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मुंबई - गोवा हा ग्रीनफील्ड महामार्ग आपण करीत आहोत. एमएमआरडीएप्रमाणे कोकणासाठी स्वतंत्र रस्ते विकास प्राधिकरणही आपण पूर्णत्वाला नेत आहोत.
कोकणचा विकास हा सरकारचा ध्यास आहे. म्हणून कोकणात अधिकाधिक उद्योग आले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात रोजगार मिळायला हवेत. त्याची सुरुवात आता झाली आहे. रस्त्यासह मूलभूत सुविधाही कोकणाला दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, या आपल्या विधानावर ते म्हणाले की, कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केले. म्हणूनच आम्ही केवळ त्याला वापरून घेणार नाही. त्याचा विश्वासघात करणार नाही. छोट्या-छोट्या उद्योगांमधून त्याच्या हाताला काम देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.