Ratnagiri: चित्तथरारक प्रसंग! गाडीसमोर बिबट्या येताच ‘त्या’ची वळली बोबडी, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:56 PM2024-09-30T14:56:23+5:302024-09-30T14:57:41+5:30
परिसरात मुक्त संचार
गणपतीपुळे : नेवरे-काेलगेवाडीमार्गे काेतवडे रस्त्याने गणपतीपुळे येथे येत असताना अचानक गाडीसमाेर बिबट्या आला. या बिबट्याला पाहून गाडी चालकाची बाेबडीच वळली आणि गाडी नियंत्रित करेपर्यंत बिबट्याच्या पुढ्यात जाऊन थांबली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने गाडी फिरवून पुन्हा काेलगेवाडी गाठली आणि सुस्कारा टाकला. हा प्रकार शनिवारी रात्री ७:३० वाजण्याच्या दरम्यान, काेलगेवाडी (ता.रत्नागिरी) येथे घडला.
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील ग्रामस्थ आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासमधील कर्मचारी संदीप कृष्णा मोहित (४३, रा.गवाणवाडी-कोतवडे, रत्नागिरी) यांनी हा चित्तथरारक प्रसंग अनुभवला. ते शनिवारी रात्री ७:३० वाजण्याच्या दरम्यान नेवरे-कोलगेवाडी मार्गे कोतवडे या रस्त्याने गणपतीपुळेकडे येत हाेते. कोलगेवाडीच्या पुढे चढामध्ये अचानक गाडीसमाेर बिबट्या आला. बिबट्याला पाहताच त्यांची बाेबडीच वळली. त्याला बघिताच गाडीवर नियंत्रण मिळेपर्यंत गाडी त्या बिबट्याच्या समाेर जाऊन थांबली. प्रसंगावधान राखत संदीप मोहित यांनी तशीच गाडी वळवून पुन्हा सुरू केली आणि तिथून परत कोलगेवाडी गाठली.
घाबरलेल्या अवस्थेत आलेल्या संदीप मोहित यांना ग्रामस्थांनी धीर दिला. त्यांना पाणी देऊन सावध केले. त्यानंतर, त्यांना घेऊन ग्रामस्थ घटनास्थळी आले. मात्र, त्यावेळी बिबट्या तेथून निघून गेला होता. त्यानंतर, संदीप मोहित हे गणपतीपुळेकडे आले आणि कामावर हजर झाले. या परिसरात दिसणाऱ्या बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
परिसरात मुक्त संचार
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे, कोतवडे, गणपतीपुळे, निवेंडी, धामणसे या परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. या परिसरात वेळोवेळी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन हाेत आहे, तसेच या परिसरातील कोंबडी, कुत्रे, मांजरे बिबट्याने फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.