बँकेत बनावट दागिने ठेवून घेतले तब्बल २३ लाखांचे कर्ज, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 06:13 PM2022-07-23T18:13:26+5:302022-07-23T18:14:14+5:30
दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिले
रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे २२ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी ५ संशयितांपैकी बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक संशयित फरार असून, ही घटना २१ जानेवारी २०१९ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी शाखा व्यवस्थापक यांनी २१ जुलै २०२२ राेजी ग्रामीण पाेलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार प्रदीप श्रीपाद सागवेकर (५१, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (५०), शुभम जनार्दन कांबळे (२४, दोन्ही रा. रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (४९, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याचा पोलीस शाेध घेत आहेत.
प्रदीप सागवेकर हा या बँकेत गेली १८ वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल, आकाशानी कांबळे, शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्याआधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण २२ लाख ८० हजार ५०० रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली होती.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देताच त्यांनी २१ व २२ जुलै रोजी ४ संशयितांना अटक केली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. चाैघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.