रत्नागिरी: कोट येथे उभारणार राणी लक्ष्मीबाईंचे भव्यदिव्य स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:55 PM2022-11-05T16:55:25+5:302022-11-05T16:55:44+5:30
भविष्यात या स्मारकाकडे पर्यटकांचा ओघ कसा वाढेल या दृष्टीने हे स्मारक बांधण्यात येणार
लांजा : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई याच्या सासरी कोट येथे भविष्यात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा शुभारंभ सोहळा पार पडत आहे. हा दुग्धशर्करा योग असल्याचे प्रतिपादन रणरागिनी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट लांजाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी कोट येथे केले. कोट येथे किल्ल्याच्या स्वरूपात भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय इतिहासात थोर वीरांगणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचे सासर आणि माहेर लांजा तालुक्यातील कोट आणि कोलधे या दोन गावांत आहे. मात्र, आजवर कित्येक वर्षे उलटून गेली, तरीही लांजासह देशभरात राणीचे भव्यदिव्य स्वरूपातील स्मारक उभे राहिलेले नाही. ही खंत लक्षात घेऊन रणरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्ट लांजाच्या माध्यमातून कोट गावी भव्यदिव्य स्वरूपातील स्मारक उभारले जाणार आहे.
या स्मारकासाठी राणीचे वंशज असलेले दत्तात्रय नेवाळकर यांनी आपल्या स्वमालकीची ८३ गुंठे जागा ट्रस्टसाठी दिली आहे. त्यानुसार, या स्मारकाचा शुभारंभ सोहळा पार पडला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड, तसेच उद्घाटक म्हणून राणी लक्ष्मीबाईंचे वंशज दत्तात्रय नेवाळकर हे उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कोटचे माजी सरपंच शांताराम उर्फ आबा सुर्वे, तसेच स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा देणारे मोहन डिके, तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, गावकर अंकुश नारकर, विजय दिवाळे, नामदेव बोलये, अनंत बोलये, संदीप बोलये, वासुदेव बोलये, सखाराम नारकर, सोना पालकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
भविष्यात या स्मारकाकडे पर्यटकांचा ओघ कसा वाढेल या दृष्टीने हे स्मारक बांधण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सांगितले. ट्रस्टचे सरचिटणीस महेंद्र साळवी यांनी सूत्रसंचलन व आभार मानले.