Ratnagiri: बंदी उठून महिना लोटला; मासेमारीची जाळी रिकामीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:06 PM2023-09-08T18:06:12+5:302023-09-08T18:07:18+5:30
आर्थिक तंगीमुळे कुणाकडे खलाशी, नौका दुरुस्त नाहीत
रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर मासेमारी सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप पूर्ण मासेमारी सुरू झालेली नाही. आगावू रकमा देऊन खलाशी आणणे अनेक मच्छीमारांना शक्य झालेले नाही. मासेमारीपूर्वी नौकांची देखभाल दुरुस्ती करणारी कारागीर मंडळी मिरकरवाडा बंदर सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील बंदरांवर कामांसाठी गेल्याने अनेक नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यातच कमी प्रमाणात मिळणारी मासळी आणि वाढलेले खर्च यामुळे ५० ते ६० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत.
मासळीचे प्रमाण कमी?
पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्टला संपली आणि मासेमारी सुरू झाली. मात्र महिना झाला तरी रत्नागिरीतील सर्व नौका मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत. ज्या नौका मासेमारीसाठी जात आहेत, त्यांनाही फारशी मासळी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेही काही नौकामालकांनी समुद्रात न जाणेच पसंत केले आहे. जे मासेमारीसाठी जात आहेत, त्यातील १० ते १२ टक्के लोकांनाच मासळी मिळत आहे. बाकी नौकांची स्थिती बिकट झाली आहे.
खलाशी आणायला पैसे नाहीत
१ ऑगस्टपासून नियमित मासेमारी आणि १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या नौका मोठ्या असल्याने त्यावर अधिक खलाशी असतात. स्थानिक पातळीवर खलाशी मिळत नसल्याने ते परप्रांतातून आणावे लागतात. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी आगावू रकमा देऊन त्यांना आणले जाते. मागील मासेमारी हंगाम बहुसंख्य मच्छीमारांसाठी तोट्याचा गेला. त्यामुळे नव्या हंगामासाठी खलाशांना आगावू देण्यासाठीची रक्कम नौकामालकांकडे नाही. खलाशी उपलब्ध नाहीत म्हणूनही काही नौका मासेमारीसाठी गेलेल्या नाहीत.
कारागीरही गेले सोडून
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौकांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करणारे कारागीर येथे पुरेसे काम नसल्याने जिल्ह्याबाहेरच्या बंदरांवर कामे मिळतील, या आशेने गेले आहेत. यामध्ये जाळी विणणे, जाळी शिवणे, नौकांच्या फळ्या बदलणे, इंजिन दुरुस्त करणे आदी कामांचा समावेश आहे. हे कारागीर जिल्ह्याबाहेर गेल्याने अनेक नौकांची दुरुस्ती झालेली नाही. या नौकासुद्धा मिरकरवाडा व अन्य बंदरातच उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याचे दिसून येत नाही.
पाऊस नसल्याने..
दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या तारखेला पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते तेव्हा वारा, पाऊस असतो. या वातावरणामुळे दूरवरच्या खोल समुद्रातील मासे किनाऱ्याच्या जवळपास येतात. त्यामुळे काही प्रमाणात मासळी जाळ्यात सापडते. परंतु यावर्षी पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन तीन दिवस झाले तरी वारा, पाऊस नसल्याने अपेक्षित मासळी मिळू लागली नसल्याचे सांगण्यात आले.
डिझेलसाठीही पैसे अपुरे
पर्ससीन नेटचा वापर करणारे मच्छीमार आठवडाभराचे डिझेलसोबत घेऊन समुद्रात जातात. त्याच्या अनुदानाचा परतावा त्यांना सरकारकडून मिळतो. पण सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक मच्छीमार चार-पाच दिवसांचाच डिझेल साठा घेऊन समुद्रात जात आहेत.