कोकणात शिवसेना 'राष्ट्रवादी'ला धक्का देणार, दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 07:03 PM2022-04-15T19:03:05+5:302022-04-15T19:03:50+5:30

शिवसेनेतील अंतर्गत वादांनी आता टाेक गाठले असल्याने नजीकच्या काही काळात हा बदल अपेक्षित मानला जात आहे.

A NCP leader from North Ratnagiri district is likely to join Shiv Sena | कोकणात शिवसेना 'राष्ट्रवादी'ला धक्का देणार, दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण

कोकणात शिवसेना 'राष्ट्रवादी'ला धक्का देणार, दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण

googlenewsNext

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या वाटेवर आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगतदार झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेतील अंतर्गत वादांनी आता टाेक गाठले असल्याने नजीकच्या काही काळात हा बदल अपेक्षित मानला जात आहे. आमदार योगेश कदम यांच्या शिवसेना उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने राष्ट्रवादीचा हा नेता आमदारकीच्या उमेदवारीसाठी लवकरच शिवसेनेत प्रवेश करेल, अशी शक्यता आहे.

राजकीयदृष्ट्या रत्नागिरी हा शांत जिल्हा आहे. मात्र, गेल्या सहा-आठ महिन्यांत उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलेच राजकीय वादळ आले आहे. भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर रिसॉर्टच्या बांधकामावरून केलेले आरोप, त्याबाबतच्या तक्रारी या साऱ्याला शिवसेना नेते रामदास कदम यांचा हातभार असल्याचा मुद्दा पुढे आला आणि राजकारणाची दिशा बदलली. रामदास कदम यांना पर्यायाने आमदार योगेश कदम यांना बाजूला करण्यासाठी पालकमंत्री परब यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पुढे केले आहे. दापोली, मंडणगड नगर पंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे योगेश कदम यांच्याकडून काढून दळवी यांच्याकडे देण्यात आली आणि पुढचे राजकारण कदम यांना बाजूला करण्याचेच असणार, हे निश्चित झाले.

शिवसेनेतील या वादात जवळून साक्षीदार असलेला राष्ट्रवादीचा नेता आता त्याच संधीआधारे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. साधारणपणे २०१५ सालापासूनच अशी चर्चा थोड्या थोड्या दिवसांनी होत होती. मात्र, आता परब यांनी कदमांविरुद्ध शड्डू ठोकला असल्याने त्यात हा राष्ट्रवादीचा नेता परबांचा शिलेदार होत आहे. त्यामुळे आता या प्रवेशाच्या चर्चांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

दापोली, खेड आणि मंडणगड विधानसभा मतदारसंघाची आमदारकी हे या राष्ट्रवादीच्या नेत्याचे ध्येय आहे. स्वत:ची सक्षम ताकद असलेला हा नेता शिवसेनेत दाखल झाला तर शिवसेना अधिक ताकदवान होईल, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडण्यात आली आहे. त्यामुळे वरच्या स्तरावरही या नेत्याबाबत सकारात्मक वातावरण आहे.

परब सेना तयार होत आहे?

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसेनेतील वादानंतर आता परब सेना तयार होत असल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकायाने व्यक्त केली. रामदास कदम आणि योगेश कदम या दोघांनीही हक्काचे मतदार तयार केले आहेत. त्याला छेद देण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना पुढे आणण्याची चाल पालकमंत्री अनिल परब यांनी खेळली आहे. ही पुढे येणारी माणसे ही कदम यांच्याविरुद्ध लढण्यासाठीची परबसेना असल्याची चर्चा शिवसेनेतच सुरु आहे.

परबविरोधी वातावरणामुळे शांतता

पालकमंत्री अनिल परब यांचे पक्षातील वजन खूप मोठे आहे. त्यामुळेच विद्यमान आमदाराला बाजूला करण्यात त्यांना पक्षाकडूनही साथ मिळाली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीतील नेत्याला शिवसेनेत घेण्याबाबतच्या त्यांच्या प्रस्तावालाही पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र हे सारे होत असताना किरीट सोमय्या यांनी तक्रार केलेले रिसॉर्ट प्रकरण आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाया हालचाली यामुळे अनिल परब एक पाऊल मागे गेले आहेत. त्यामुळेच या नेत्याचा प्रवेश लांबला आहे.


वैभव खेडेकर यांच्या नावाचीही चर्चा

खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हेही शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. कदम पितापुत्रांना पर्याय म्हणून दापोलीत सूर्यकांत दळवी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. खेडमध्ये सक्षम पर्याय हवा म्हणून खेडेकर यांच्या नावाचा विचार सुरु होता. मात्र परब यांच्याविरुद्धच्या हालचालींमुळे त्या प्रस्तावालाही ब्रेक लागला असल्याची चर्चा आहे.

Web Title: A NCP leader from North Ratnagiri district is likely to join Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.