Ratnagiri: कशेडी बोगद्यातील एक मार्गिका खुली, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार
By अरुण आडिवरेकर | Published: September 11, 2023 03:21 PM2023-09-11T15:21:08+5:302023-09-11T15:21:39+5:30
गेली तीन वर्षे या बाेगद्याचे काम सुरू आहे
खेड : मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर हाेणार आहे. मुंबई - गाेवा महामार्गावरील कशेडी घाटात (ता. खेड) तयार करण्यात आलेल्या बाेगद्यातील एक मार्गिका साेमवार (११ सप्टेंबर)पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली. यामुळे घाटातील अवघड वळणापासून प्रवाशांची सुटका झाली आहे.
गणेशाेत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक कोकणात आपल्या मूळ गावी सण साजरा करण्यासाठी येतात. उत्सवासाठी स्वतः चे किंवा भाड्याने छोटे चारचाकी वाहन घेऊन गावी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अवघड वळण आणि खड्डेमय रस्ता यामुळे गावी येणाऱ्या मुंबईकरांचे हाल हाेत हाेते. हे हाल थांबविण्यासाठी चाैपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बाेगदा तयार करण्यात आला आहे. या बाेगद्याची लांबी १.७१ किलाेमीटर इतकी आहे.
गेली तीन वर्षे या बाेगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बाेगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला हाेता. त्यानुसार साेमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. ठेकेदार कंपनीने बाेगद्यात सुरक्षेच्या कामांसह वीजपुरवठ्याचीही व्यवस्था केली आहे. या बाेगद्यातून प्रवास करताना वाहनाची वेग मर्यादा ३० किलाेमीटर प्रती तास इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच वाहनचालकांनी बाेगद्यात काेठेही वाहन थांबवू नये अशी सूचना देण्यात आली आहे.