Ratnagiri: मोबाईलसाठी एका प्रवाशाने मंगला एक्सप्रेस थांबवली, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली
By संदीप बांद्रे | Updated: July 25, 2024 19:35 IST2024-07-25T19:35:26+5:302024-07-25T19:35:56+5:30
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा किमती मोबाईल गाडीतून पडताच त्याने रेल्वेची चेन ...

Ratnagiri: मोबाईलसाठी एका प्रवाशाने मंगला एक्सप्रेस थांबवली, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा किमती मोबाईल गाडीतून पडताच त्याने रेल्वेची चेन ओढली आणि रेल्वे थांबवली. त्यानंतर काही वेळाने ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. ही घटना चिपळूण हद्दीतील धामणदिवी बोगद्यानजिक गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
कोकण रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा काही प्रवासी रेल्वे बोगीच्या दरवाज्यात अथवा खिडकीजवळ मोबाईल घेऊन बसतात. तेथेच चार्जीगची व्यवस्था असल्याने एकाचवेळी काही मोबाईल तेथे चार्जिंगसाठी ठेवले जातात. अशाच एका प्रवाशाच्या हातातील किमती मोबाईल अचानक रेल्वेगाडीतून खाली पडला. त्याने वेळ न घालवता तत्काळ रेल्वेची चेन खेचली आणि गाडी थांबवली. धामणदिवी बोगद्यातून बाहेर आल्यावर गाडी थांबली होती. त्यामुळे सुरुवातीला गाडी नेमकी कशासाठी थांबवली हे कर्मचाऱ्यांनाही समजू शकले नाही.
मात्र याविषयीची माहिती तत्काळ रेल्वेच्या यंत्रणेला देण्यात आली. त्यामुळे काहीशी तारांबळ उडाली. शिवाय बोगद्याजवळ थांबलेली रेल्वे पाहून स्थानिक ग्रामस्थानीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एका प्रवाशाचा मोबाईल रेल्वेतून खाली पडल्याची खात्री पटताच काही वेळाने ही गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली.