रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 03:01 PM2022-07-11T15:01:12+5:302022-07-11T15:02:17+5:30

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.

A power pole fell on a bus transporting students in Ratnagiri | रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

googlenewsNext

रत्नागिरी : माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली. विद्युत खांब बसच्या बॉनेटवर पडला. त्यामुळे सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर महावितरणचा अनागोंदी कारभार समोर आला.

माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज येथे शिक्षणासाठी नांदिवली (ता. लांजा) भागातून विद्यार्थी येतात. नांदिवली येथून नाणीज येथे दररोज शाळेची बस क्रमांक (एमएच-०८-एपी-१२८६) मधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. दरम्यान रोडवरील बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.

दैव बलवत्तर म्हणून गाडीच्या पुढच्या भागावर हा खांब आदळला त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.  चालक प्रशांत पांचाळ यांनी  प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावून आले. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वर खांब कोसळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

या अपघातानंतर तरी महावितरणने रस्त्याच्या जवळील, तसेच गावातील धोकादायक विजेचे खांब हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जोराच्या पावसामुळे, वाऱ्यामुळे धोकादायक स्थितीतील खांब कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

Read in English

Web Title: A power pole fell on a bus transporting students in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.