रत्नागिरीतील चुनाकोळवणमध्ये आढळले दुर्मिळ "नेवर" प्रजातीचे फुल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:52 AM2023-08-12T11:52:53+5:302023-08-12T11:53:05+5:30
विनोद पवार राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाहून सुमारे 25 किमी अंतरावर असणारे चुनाकोळवण हे गाव "सवतकडा" आणि "परिटकडा" या ...
विनोद पवार
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाहून सुमारे 25 किमी अंतरावर असणारे चुनाकोळवण हे गाव "सवतकडा" आणि "परिटकडा" या दोन नितांत सुंदर धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहेच. आता या गावात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या "नेवर" प्रजातीच्या झाडाचे फुल आढळून आल्याने चुनाकोळवण गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
चुनाकोळवण गावात श्री लक्ष्मी नारायण, श्री लक्ष्मीकांत, श्री कालीमाता आणि श्री शंकर अशा चार मंदिराचा समुह असून त्यांच्या मधोमध एक तलाव आहे. माजी मुख्याध्यापक व पर्यावरणप्रेमी आनंद केशव उर्फ AK मराठे ही मंदिरे पाहण्यासाठी गेले असता त्यांना याठिकाणी फुलांचा लोंबता गुच्छ दिसला. त्याचे फोटो काढून त्यांनी कुडाळ येथील अभ्यासक डॉ. मानसी करंगुटकर, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथील वनस्पतीशास्त्राचे प्रा. डॉ. शरद आपटे आणि भारतातील फुलांचे गाढे अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांच्याशी चर्चा केली.
डॉ.करंगुटकर यांनी हे फुल Barringtonia Racemosa असे शास्त्रीय नाव असणाऱ्या नेवर नावाच्या झाडाचे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. डॉ.आपटे यांनीही हे झाड नेवर /तीवर किंवा समुद्रफळ यापैकी एका प्रजातीचे असू शकते असे प्रतिपादन केले. डॉ. इंगळहळीकर यांनी मात्र हे खारफुटी मॅनग्रोव्हजच्या संगतीत वाढणाऱ्या समुद्रफळ या नितांतसुंदर व दुर्मिळ झाडाचे फुल असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. सामान्यपणे खाऱ्या पाण्याच्या कडेला वाढणाऱ्या या झाडाची Back Mangrove प्रकारात मोडणारी जात गोड्या पाण्यातही वाढू शकते असेही मत त्यांनी व्यक्त केले.
चार दिवसांपूर्वीच "सोहोळा" चे फुल प्रकाशात आणल्यानंतर दोनच दिवसात आणखी एका दुर्मिळ फुलाचा शोध लावल्याने मराठेसरांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून जिज्ञासू अभ्यासकांनी चुनाकोळवणला भेट देऊन या फुलाची प्रत्यक्ष पहाणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ओणीमार्गे जाणारा रस्ता प्रचंड खराब असल्याने मुंबई गोवा महामार्गवरील मंदरूळ फाट्यावरून जाणे अधिक सुकर असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे.