रत्नागिरीत मांत्रिकाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:06 PM2024-06-25T17:06:42+5:302024-06-25T17:07:06+5:30
देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेतले
रत्नागिरी : घरातील संकटे दूर करण्यासाठी मांत्रिकाकडे दागिने देण्याच्या बहाण्याने ७ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन जाणाऱ्याला शहर पाेलिसांनी अटक केली आहे. सुभाष बाबासाहेब सुर्वे (४९, रा. विश्वशांती संकुल, अभ्युदयनगर, दैवज्ञ भवनजवळ, नाचणे, रत्नागिरी), असे त्याचे नाव आहे. त्याला पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. सुभाष सुर्वे हा रिक्षा चालक असून, नियमित भाडेकरूंचा विश्वास बसल्यानंतर ताे फसवणुकीची संधी साधत असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे.
प्रसाद शंकर मराठे (४२, रा. बिल्वमंगल सोसायटी, उत्कर्षनगर कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभ्युदयनगर येथील रिक्षा व्यावसायिक सुभाष सुर्वे हा कुवारबाव परिसरात रिक्षा व्यवसाय करतो. अनेक वेळा प्रवासी त्याच्या रिक्षेतून गेल्यानंतर त्यांचाही सुभाषवर विश्वास बसतो. हा विश्वास बसलेल्या प्रसाद मराठे व प्राची महेश आखरेकर यांना सुभाष सुर्वे याने तुमच्या घरात अनेक अडचणी आहेत. याची मला माहिती आहे. माझ्या ओळखीचे बाबा आहेत. ते ही संकटे दूर करतील. त्यासाठी देवापुढे आकार ठेवण्यासाठी तुमचे दागिने हवे आहेत असे सांगून त्याने ७ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेतले.
सोन्याचे दागिने व रोख रक्कम काम झाल्यानंतर परत आणून देतो असे त्याने सांगितले; परंतु वारंवार दागिने मागूनही सुभाष सुर्वे याने ते परत न केल्याने अखेर प्रसाद मराठी यांनी पाेलिस स्थानक गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.