तोतया पोलिसांची लुटारु टोळी; रत्नागिरी, चिपळूण येथे वृद्धांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:17 PM2023-02-27T12:17:47+5:302023-02-27T12:18:33+5:30
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले
रत्नागिरी : पाेलिस असल्याचे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे दाेन वृद्धांना लुटल्याच्या घटना शनिवारी (२५ फेब्रुवारी) घडल्या. याप्रकरणी रत्नागिरीत तिघांविराेधात तर चिपळुणात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्यांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले असून, दागिने लुटणारी टाेळी पुन्हा जिल्ह्यात कार्यरत झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरीतील घटनेबाबत गिरीधर दत्तात्रय साखरकर (७३, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी दुपारी १:३० वाजता श्रीदेव भैरी मंदिरातून देवदर्शन करून रस्त्याने चालत जात हाेते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी आपण पाेलिस असल्याचे सांगत सुरक्षिततेसाठी बाेटातील अंगठ्या कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत ठेवत असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांना बाेलण्यात गुंतवून कागदाच्या पुडीतील अंगठ्या चाेरून पुडीत दगड ठेवून पाेबारा केला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
असाच प्रकार चिपळूण येथे घडला असून, दिवाकर गाेविंद नेने (७५, रा. प्रांत ऑफिससमाेर, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. ते शनिवारी सकाळी १० वाजता दूध आणण्यासाठी जात असताना दाेन अज्ञात व्यक्तींनी त्यांना ‘ओ काका जरा इकडे या,’ अशी हाक मारून बाेलावून घेतले. दाेघांनी काेराेनाचे कारण सांगून मास्क वगैरे विचारून तुमच्याकडील माेबाईल, घड्याळ, साेन्याचे दागिने रुमालात बांधून ठेवा. पुढे चाेऱ्या हाेत आहे, आम्ही पाेलिस आहाेत, आम्ही सगळ्यांना सांगत आहाेत, असे सांगितले.
त्यानंतर नेने यांना गळ्यातील साेन्याची चेन व हातातील अंगठी, माेबाईल व घड्याळ रुमालात गाठी मारून खिशात ठेवण्यास सांगितले. या वस्तू खिशात ठेवून ते दूध आणण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांनी खिशातील रुमालात पाहिले असता दागिने, माेबाईल, घड्याळ नसल्याचे लक्षात आले. आपल्याकडील ऐवज चाेरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. दाेन्ही घटनांमध्ये चाेरीला गेलेल्या ऐवजाचा तपशील पाेलिसांनी दिलेला नाही. त्यामुळे त्याचा तपशील मिळू शकलेला नाही.