रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 05:22 PM2022-05-25T17:22:58+5:302022-05-25T17:23:45+5:30

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले ...

A series of accidents in Ratnagiri district, 36 accidents in 23 days | रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

रत्नागिरी जिल्ह्यात अपघातांची मालिका, २३ दिवसात तब्बल ३६ अपघात

googlenewsNext

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर प्रथमच यंदा जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली खरी, मात्र त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ मे महिन्याच्या २३ दिवसात जिल्ह्यात ३६ अपघात झाले असून, त्यात १८ जण ठार, तर ५५ जण जखमी झाले आहेत. यातील बहुतांश अपघात मुंबई - गोवा महामार्गावर झाले आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे लोक घराबाहेर पडणे टाळत होते. सरकारी निर्बंधांपेक्षा कोरोनाच्या भीतीने लोक आपले घर, गाव सोडून बाहेर जात नव्हते. मात्र, यंदा वातावरण निवळले आहे. कोरोना जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य पर्यटक आले आहेत. रत्नागिरी, गुहागर, दापोली यांसारख्या किनारपट्टीच्या भागात तर पर्यटकांची खूप वर्दळ आहे.

वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता बहुतांश पर्यटक हे खासगी वाहनानेच आले असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत मुंबई - गोवा महामार्गावर आणि शहरांतर्गतही वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

रुंदीकरण झाले, पण...

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद आणि वळणावळणांचा असल्याने अपघातांची संख्या अधिक आहे, असा आक्षेप घेतला जात होता. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा होती. सद्यस्थितीत खेड तसेच चिपळूण तालुक्यातील बऱ्याचशा महामार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. तेथील वळणे कमी झाली आहेत. पण तेथील अपघात अजूनही कमी झालेले नाहीत.

चांगला रस्ता, वेग वाढला

चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. वळणे कमी झाली असली तरी आहेत त्या वळणात गाड्यांचा वेग कमी होत नाही. कोकणाबाहेरील वाहनचालकांना या वळणांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाड्या रस्त्याशेजारी कलंडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात बेपर्वाई हेच प्रमुख कारण आहे.

मदतीमुळे मृत्यू कमी

महामार्गावर शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होतात. नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका थोड्याच वेळात अपघातस्थळी पोहोचतात. त्यामुळे अपघातांची संख्या अधिक असली तरी वेळेत उपचार मिळत असल्याने मृत्यूचे प्रमाण मात्र सुदैवाने आटोक्यात राहिले आहे.

तालुकानिहाय अपघात

१ मेपासून खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी ९, रत्नागिरीत ८, संगमेश्वरमध्ये ४, लांजात ३, राजापुरात २, तर दापोलीत एक अपघात झाला.

Web Title: A series of accidents in Ratnagiri district, 36 accidents in 23 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.