Ratnagiri- गावे एका बाजूला अन् मार्ग दुसऱ्या बाजूला, महामार्गावरील फलकांमुळे प्रवाशांची ‘दिशा’ चुकतेय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:37 PM2023-04-03T14:37:25+5:302023-04-03T14:37:48+5:30
प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या चौपदरीकरणामुळे कोकणातील महामार्ग चर्चेत आलेला आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी महामार्गावरील मैलांच्या दगडावरील शहरांची नावेही चुकीच्या पद्धतीने लिहून मराठीची मोडतोड करण्यात आल्यानंतर आता वालोपे आणि कळंबस्ते येथे उभ्या करण्यात आलेल्या मार्गफलकावर गावे एका बाजूला असून त्यांची दिशा भलत्या बाजूला दाखवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. चुकीची दिशा दाखवणारे हे फलक वादात सापडले आहेत.
महामार्गावर काही दिवसांपूर्वी चिपळूण ऐवजी ‘चिपलून’ व पेणचे ‘पेन’ असे नामफलक लिहिल्याने मराठीची करण्यात आलेल्या मोडतोडीवर संताप व्यक्त होत आहे. असे असताना आठ दिवसांपूर्वी परशुराम ते खेरशेत या ३६ किलोमीटर अंतरात चिपळूण टप्प्यातील वालोपे आणि कळंबस्ते येथे मोठे मार्गफलक बसवण्यात आले आहेत. वालोपे येथील या मार्गफलकावर मुंबईकडे जाण्याच्या मार्गावर एक फलक उभारला आहे. त्यावर परशुराम उजव्या बाजूला असताना दिशा मात्र गुहागरकडे दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास करणारी वाहने ही फरशी तिठा येथे उतरून गुहागरच्या दिशेने वळत आहेत.
अशाच पद्धतीचा फलक कळंबस्ते येथे उभारण्यात आला आहे. येथे बसवण्यात आलेल्या मार्गफलकावर सावर्डेची दिशा खेड हद्दीतील पंधरागावकडे दाखवण्यात आल्याने प्रवासी वाहने कळंबस्तेतून पंधरागावकडे जात आहेत.
एकूणच महामार्गावरील या मार्ग फलकांमुळे प्रवासी वाहनांचा गोंधळ उडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या महामार्गावर हवाई पाहणी करणार असल्याने घाईगडबडीत हे मार्गफलक कंत्राटदार कंपनीने उभारल्याचे समजते. मात्र सुरू असलेल्या गोंधळाबाबत कंपनीने अजूनही दखल घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कंत्राटदार कंपनी कशापद्धतीने आपली मनमानी करत आहे हे वालोपे आणि कळंबस्ते येथे उभ्या केलेल्या मार्गफलकावरून दिसत आहे. गावे एका बाजूला आणि त्यांची दिशा भलत्या बाजूला दाखवण्यात आल्याने गोंधळ उडत आहे. कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी या नामफलकांची तत्काळ दुरुस्त करून घ्यावी. - शौकत मुकादम, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण