स्फोटकाने भरलेला टॅंकर महामार्गावर धावतोय, पोलिसांची धावाधाव अन् हाती काहीच नाही!
By मनोज मुळ्ये | Published: July 23, 2023 04:48 PM2023-07-23T16:48:20+5:302023-07-23T16:49:39+5:30
सुदैवाने या टॅंकरमध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर स्फोटकांनी भरलेला टॅंकर धावत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली आणि मुंबई पोलिसांसह कोकणातील पोलिसांचीही धावपळ उडाली. तातडीने पोलिसांनी महामार्गावर शोध मोहीम सुरू केली आणि संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे संबंधित टॅंकर अडविण्यात आला.
सुदैवाने या टॅंकरमध्ये कोणतेही संशयास्पद साहित्य नसल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रविवारी सकाळी पोलिस महासंचालकांच्या नियंत्रण कार्यालयात एक निनावी फोन आला आणि स्फोटकाने भरलेला एक टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावर असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून मुंबई - गोवा महामार्गावरील सर्वच जिल्ह्यांमधील पोलिसांना तपासणीच्या सूचना दिल्या.
रत्नागिरी जिल्हा पोलिसांनीही तातडीने महामार्गावर तपासणी सुरू केली. त्यात संशयास्पद टॅंकर वांद्री येथे पकडण्यात आला. सुदैवाने या टॅंकरमध्ये काहीही संशयास्पद साहित्य आढळले नाही. या टॅंकरमध्ये पॉलिथिन बनविण्याचे सामान होते, अशी माहिती पुढे आली आहे. तरीही खबरदारी म्हणून आवश्यकत्या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या जात आहेत. तसेच, महामार्गावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.