परभणी वरून सावंतवाडीकडे येणाऱ्या शिक्षकाचा बसमध्येच मृत्यू, कणकवली फोडा दरम्यान हृदयविकाराचा झटका
By अनंत खं.जाधव | Published: January 18, 2023 08:06 PM2023-01-18T20:06:44+5:302023-01-18T20:07:10+5:30
मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील असलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत
सावंतवाडी :
मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील असलेले व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे (५३) हा परभणी हून सावंतवाडी कडे येत असतनाच कणकवली तालुक्यातील फोडा येथे गोवा बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
हरिभाऊ घोगरे तीन वर्षांपासून सरमळे शाळेत कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी यापुर्वी डेगवे शाळेत ही सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आले होते.
तर बुधवारी सकाळी मिरज – पणजी या कदंबा गाडीने सावंतवाडीत येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हा परिषदेचे प्राथमिक म शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, विस्तार अधिकारी साळगावकर, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, म ल देसाई, नारायण नाईक यांच्यासह त्यांच्या सहकारी शिक्षकांनी तात्काळ फोंडा येथे धाव घेतली. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेने त्यांच्या गावी नेण्यात आले. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील भाऊ, बहीण असा परिवार आहे.