क्लासच्या फीसाठी लिंकवर क्लिक केले अन् क्षणात ८० हजार रुपये गेले, रत्नागिरीतील खेडशीमधील शिक्षिकेला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:09 PM2022-12-12T12:09:53+5:302022-12-12T12:10:23+5:30
मोबाईलवर प्रवेश फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. साबळे यांना या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले.
रत्नागिरी : अबॅकस क्लासची ऑनलाइन फी देण्याच्या बहाण्याने शिक्षिकेच्याच खात्यातील सुमारे ८० हजार रुपये लंपास करण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी (९ डिसेंबर) सायंकाळी खेडशी येथे घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात प्रवीण कुमार (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दीप्ती दत्ताराम साबळे (३२, रा. खेडशी - श्रीनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. दीप्ती साबळे या शिक्षिका असून, त्या अबॅकसचे क्लास घेतात. प्रवीण कुमार नावाच्या व्यक्तीने त्यांना शुक्रवारी सायंकाळी फोन करून आपल्या दोन मुलांना अबॅकससाठी प्रवेश घ्यायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फी भरण्यासाठी गुगल पे वरून २ रुपये पाठवून साबळे यांना खात्री करण्यास सांगितले. त्यावर साबळे यांनी पैसे जमा झाल्याचे प्रवीण कुमार याला सांगितले.
दीप्ती साबळे यांचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रवीण कुमारने त्यांच्या मोबाईलवर प्रवेश फीची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकली. साबळे यांना या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितले. साबळे यांनी पासवर्ड टाकल्यानंतर त्यांच्या खात्यातील ७९ हजार २४० रुपये काढून घेण्यात आले. प्रवीण कुमार याने हे पैसे आपल्या खात्यात घेऊन साबळे यांना गंडा घातला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीप्ती साबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात १० डिसेंबर रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून प्रवीण कुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.