रत्नागिरीत तीन महिन्याच्या बाळाची ६० हजाराला खरेदी, पाचजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:17 PM2024-05-18T17:17:04+5:302024-05-18T17:17:43+5:30
नोंदणीसाठी गेले अन् अडकले
रत्नागिरी : मुंबईत बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भांडाफाेड झालेला असतानाच बेकायदेशीरपणे मूल दत्तक घेण्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरीत घडल्याचे समाेर आले आहे. मुंबईतील एका दाम्पत्याने तीन महिन्याचे बाळ रत्नागिरीतील दाम्पत्याला ६० हजाराला विकल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील दाम्पत्यासह ५ जणांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुंबईतील मालाड येथील एका २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ फेब्रुवारी २०२४ राेजी घडला हाेता. मात्र, महिलेच्या फिर्यादीनंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या शिरगाव येथील एका दाम्पत्याला मूल नसल्याने त्यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याने ओळखीच्या माणसांकडे चाैकशी केली. तसेच त्यांना याबाबत कल्पना दिली. यावेळी मुंबईतील जाेडप्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलाचा सांभाळ करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना आपले तीन महिन्याचे बाळ दत्तक द्यायचे आहे, अशी माहिती शिरगाव येथील दाम्पत्याला मिळाली.
त्यानंतर या दाम्पत्याने मुंबईतील दाम्पत्याशी संपर्क साधून बाेलणी केली. प्राथमिक बाेलणीनंतर ते आपले बाळ दत्तक देण्यास तयार झाले. बाळाला दत्तक देण्यासाठी हे दाम्पत्य रत्नागिरीत आले हाेते. ते शहरातील एका लाॅजवरही थांबले हाेते. त्यानंतर या बाळाला शिरगाव येथील दाम्पत्याकडे स्वाधीन करण्यात आले. त्याबदल्यात त्यांना ६० हजार रुपये देण्यात आले. मात्र, बाळाच्या विक्रीबाबत त्याच्या आईने फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समाेर आला. याप्रकरणी तिच्या पतीसह अन्य चाैघांविराेधात बालन्याय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नोंदणीसाठी गेले अन् अडकले
मूल दत्तक घेतल्यानंतर भविष्यात काेणतीही अडचण येऊ नये यासाठी या बाळाची दत्तक नाेंदणी करण्याचे शिरगाव येथील दाम्पत्याने ठरविले. मात्र, बाळ दत्तक घेण्यासाठी शासकीय नियमावली आहे. त्यानुसार हे बाळ घेतलेले नव्हते. त्यामुळे रत्नागिरीतील एका कार्यालयात नाेंदणीसाठी गेले असता हा प्रकार समाेर आला.