दापोलीच्या समुद्रात पोहायला गेलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू
By अरुण आडिवरेकर | Published: December 11, 2023 10:47 AM2023-12-11T10:47:39+5:302023-12-11T10:47:55+5:30
या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना देण्यात आली आहे.
दापोली : तालुक्यातील कर्दे येथील समुद्रकिनार्यावर पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४:३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दशरथ जगदीश यादव (४०, रा. घोरपडे पेठ, वेगा सेंटर समोर, शंकरशेठ रोड स्वारगेट पुणे) असे त्यांचे नाव आहे. समुद्रस्नान करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती किरण कैलास निवंगुने (रा. पुणे) यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली आहे. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमधील दशरथ यादव हे बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. ही घटना कळताच स्थानिकांनीही त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पुणे परिसरातील एकूण चार मित्र पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. या घटनेत मृत्यू झालेले दशरथ यादव हे अविवाहित असून, पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक दापोलीत दाखल झाल्यावर विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेची नोंद रविवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.