विद्यार्थ्यांना घडविली हवाई युद्ध यंत्रांची सफर
By संदीप बांद्रे | Published: November 6, 2023 04:07 PM2023-11-06T16:07:29+5:302023-11-06T16:07:52+5:30
चिपळूण : माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित लोहगाव - पुणे येथील हवाई दलाला डेरवण येथील ...
चिपळूण : माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित लोहगाव - पुणे येथील हवाई दलाला डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचालित एसव्हीजेसीटी शाळेच्या नववी आणि दहावीच्या ८३ विद्यार्थी आणि शिक्षकांनी नुकतीच भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी हा एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव होता.
कडक बंदोबस्तात सुरक्षिततेच्या नियमांनुसार खबरदारी घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना हवाई युद्ध यंत्रांची सफर घडविण्यात आली. मॅनपॅड्स मिसाईल, आकाश मिसाईल, रडार, मशीन गन्स, इ. कार्यरत युद्ध उपकरणे विद्यार्थ्यांना जवळून पाहता आली. तसेच काही शस्त्रे हाताळताही आली. लढाऊ विमान सुखोई ३० च्या प्रशिक्षित वैमानिकाने सुखोई ३० ची ठळक वैशिष्ट्ये प्रत्यक्ष विमानाभोवती विद्यार्थ्यांना नेऊन समजावून सांगितली.
जगातील सर्वात चपळ लढाऊ विमान सुखोई-३० च्या अत्यंत अनुभवी वैमानिकांनी एरोबॅटिक प्रात्यक्षिक करताना लूप, स्पिन, टंबल, स्टॉल, रोल, टच द स्काय, स्टॅन्ड स्टील यासारखे थरारक प्रदर्शन करून निखळ कौशल्य प्रकट केले. फ्लाइट- सिम्युलेशन स्टेशनमध्ये सुखोई-३० फ्लाइट- सिम्युलेशनने सर्वांना आभासी उड्डाणावर नेले. तसेच विशेष प्रशिक्षित सैन्यदल ‘गरूड’ने आकाशातील हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने एकामागोमाग एक जमिनीवर उतरून शिस्तबद्ध चाल करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांसाठी हे अनुभव केवळ उत्साहवर्धकच नव्हे, तर रोमांचकही होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लढाऊ वैमानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि युद्ध यंत्रे व त्यांच्या प्रशिक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले. स्वतः माजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक आणि एअर ऑफिसर कंमान्डिंग शेखर यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी हवाई दलाचे चिन्ह असलेला मोठा मग प्रत्येक विद्यार्थ्याला आठवण म्हणून देण्यात आला.