मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडीतील एक बोगदा पुन्हा बंद, गणेशोत्सवासाठी करण्यात आला होता सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:42 AM2024-09-19T11:42:20+5:302024-09-19T11:42:54+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा अपूर्ण असलेल्या अंतर्गत कामांसाठी २० ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा अपूर्ण असलेल्या अंतर्गत कामांसाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी ५ सप्टेंबरपासून कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी हा बाेगदा सुरू करण्यात आला होता.
गतवर्षी गणेशोत्सवात दोनपैकी एका बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली. त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली. तो बोगदा या वर्षी २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी लहान वाहनांसाठी पुन्हा सुरू झाला. आता यावेळेच्या गणेशोत्सवासाठी दुसरा बोगदाही मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड यादरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामांमुळे गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे गौरी - गणपती विसर्जन आटोपून परत जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फारसा फटका बसलेला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली होती. वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते.
दीड महिना बंद राहणार
सद्य:स्थितीत मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता एका बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक केली जात आहे. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या बोगद्यातून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बोगद्यातील अपघातांनाही आळा बसलेला आहे. मात्र, अपूर्ण असलेली अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी नुकताच सुरू करण्यात आलेला दुसरा बोगदा २० सप्टेंबरपासून पुढील एक ते दीड महिना बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.