चिपळूण पंचायत समितीत घडला विनयभंगाचा प्रकार, गट विकास अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल
By संदीप बांद्रे | Published: April 20, 2024 05:57 PM2024-04-20T17:57:34+5:302024-04-20T17:57:54+5:30
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांची कार्यवाही
चिपळूण : येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवून सातत्याने त्रास देणाऱ्या त्याच विभागातील एका लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय खामकर असे त्याचे नाव असून चिपळूण पोलिसांनी त्याच्यासह या प्रकरणात संबंधित तरुणीस न्याय देण्यास सहकार्य न केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील आणि पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पाणीपुरवठा विभागातील लिपिक खामकर हा सप्टेंबर महिन्यापासून संबंधित महिलेच्या व्हाट्सअप वर सातत्याने मेसेज टाकत होता. आणि संबंधिताला भेटून शिवीगाळही केली होती. असे त्या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने येथील गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती.
मात्र त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. जर तू तक्रार दिली, तर तुला कामावरून काढले जाईल अशी धमकी दिली त्यामुळे पोलिसांनी बिडीओ विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तर उपअभियंता अविनाश जाधव हे आपल्याला नेमून दिलेले काम न देता जास्त वेळ थांबून घेऊन वेगळेच काम देत होते. अशी तक्रार पोलिसात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध भादवीं कलम 354 अ, 509, 506, 294 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.