खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या भाषणाची क्लिप सुरु झाली; एकनाथ शिंदेंही मागे फिरले अन्...
By मुकेश चव्हाण | Published: March 20, 2023 11:51 AM2023-03-20T11:51:58+5:302023-03-20T11:59:23+5:30
खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली.
खेड येथे रविवारी (१९ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पक्षावर सातत्याहो होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
खेड येथील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सभेला संबोधित करताना खोके आणि गद्दारी करून नव्हे तर खुद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवून आणल्याचे एकनाथ शिंदे ठणकावून सांगितले. सगळीकडे तीच टेप आणि फक्त दोन मुद्यांवर टीका हेच रडगाणं आता राज्यभर ऐकायला मिळणार असल्याचा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
२०१९ साली आपण केलीत ती खरी गद्दारी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा दिवा आपल्या डोक्यात पेटवल्याने सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिलीत, असा निशाणाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. तसेच दाऊदशी व्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घातलंत, हिंदुत्वाचा विचार सोडून दिलात, सावरकरांवर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलंत, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणायला तुमची जीभ कचरायला लागली त्यामुळेच हिंदुत्ववादी विचार जागे ठेवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली, असं मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
विशेष म्हणजे या सभेत उद्धव ठाकरे यांच्या जुन्या सभेतील काही व्हिडिओ देखील स्क्रीनवर लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, नेते अजित पवार यांच्यावर टीका याआधी केली होती. या टीका केलेल्याचा उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी स्क्रीनवर लावण्यात आला. भाषणासाठी एकनाथ शिंदे तयार होते. ते उभेही राहिले मात्र उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ सुरु झाल्याने ते पुन्हा खुर्चीवर बसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ संपल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान, कोकणात सभा आहे म्हणून फक्त आगपाखड करायला आलो नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी काही घोषणा केल्या. कोकणचे पाणी अडवून कोयनेत सोडण्याच्या खेड कोयना प्रकल्पासाठी २४३ कोटी रुपये मंजूर केल्याचे याप्रसंगी सांगितले. तसेच कोकणातील लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यासमयी दिली. खेड नळपाणी योजना ४५ कोटी, क्रीडा संकुल २० कोटी, मरीन पार्क अशा अनेक विकासकामांना मंजुरी दिली जाईल असे यावेळी बोलताना नमूद केले. कोकणात येणाऱ्या वादळांमुळे नादुरुस्त होणाऱ्या विजेचे खांब दुरुस्त करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केल्याचे याप्रसंगी जाहीर केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"