मुंबई-गोवा महामार्गावरील भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

By संदीप बांद्रे | Published: June 19, 2023 07:14 PM2023-06-19T19:14:11+5:302023-06-19T19:21:26+5:30

स्थानिक चित्रकार आणि मुंबईतील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ही चित्रे रेखाटण्यात आली

A view of the nature of Konkan on the wall on the Mumbai Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावरील भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

मुंबई-गोवा महामार्गावरील भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

googlenewsNext

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बांधलेल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंतीवर कोकणातील सौंदर्य रेखाटण्यात आले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भिंती आता आकर्षित करू लागल्या आहेत. स्थानिक चित्रकार आणि मुंबईतील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चिपळूण विभागांतर्गत परशुराम ते आरवलीपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्यात कामथे हा महत्त्वाचा घाट रस्ता आहे. घाटात दरडी कोसळून माती रस्त्यावर येऊ नये यासाठी डोंगर भागाच्या बाजूने भिंती उभारण्यात आल्या आहेत. या भिंती रंगविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली हाेती. या भिंतीवर कोकणातील लोकसंस्कृती, जीवनशैली, ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक संपत्ती, शेतीवर आधारित जीवन, मत्स्य व्यवसाय असे एकापेक्षा एक सुंदर विषय घेऊन चित्रे साकारण्यात आली आहेत.

कोकणातील शेतीची विविध कामे खाद्य, वाद्य संस्कृती नृत्यकला, बैलगाडी, समुद्र, मासेमारी, निसर्ग अशा विविध छटा कलाकारांनी साकारल्या आहेत. सावर्डेहून चिपळूणला येताना आणि चिपळुणातून सावर्डेकडे जाताना या भिंती नजरेस पडतात. भिंतींवर साकारण्यात आलेली सुंदर चित्रे नागरिकांचा प्रवास सुखकर करत आहेत.


सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण काही दिवसापूर्वी चिपळूण दाैऱ्यावर आले होते. त्यांनी घाटात उभारलेल्या भिंती रंगवण्याची कल्पना सुचवली होती. त्यानुसार या भिंती रंगवण्यात आल्या आहेत. - श्याम खुणेकर, कनिष्ठ अभियंता चिपळूण.

Web Title: A view of the nature of Konkan on the wall on the Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.