उत्तर प्रदेशमधील कुटुंबाच्या गाडीला राजापुरात अपघात, महिलेचा मृत्यू
By मनोज मुळ्ये | Published: April 5, 2024 07:01 PM2024-04-05T19:01:59+5:302024-04-05T19:05:41+5:30
राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे ...
राजापूर : पुण्यातील कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील चौरसिया कुटुंबाच्या गाडीला अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे (ता. राजापूर) येथे आज, शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात राजरानी चौरसिया (वय-६८) या महिलेचा मृत्यू झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून हा अपघात झाला.
उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी उत्तरप्रदेशहून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून ते गोव्याला फिरण्यासाठी निघाले हाेते. शक्ती राजाराम चाैरसिया (२६, रा. पुणे) हे चारचाकी गाडी (युपी ५३, डीएम ८०९०) घेऊन पुण्यावरून ओणी-विटा महामार्गाने अणुस्कुरा-पाचल-ओणी असा प्रवास करत होते. या गाडीतून पाचजण प्रवास करत हाेते. ही गाडी शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता अणुस्कुरा-ओणी मार्गावरील येळवण-बागवे येथे आली असता शक्ती चाैरसिया यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जुनाट झाडावर आदळली.
ही धडक एवढी जबरदस्त हाेती की, राजरानी चौरसिया यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच राजरानी चाैरसिया यांचा माेठा मुलगा चालक शक्ती चौरासिया, संजयकुमार चौरासिया (४७), सरिता संजय कुमार चौरासिया (४२) आणि चार वर्षाची लहान मुलगी किमाया चौरासिया किरकाेळ जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती रायपाटण पोलिस स्थानकाचे पाेलिस काॅन्स्टेबल नीलेश कात्रे, स्वप्निल घाडगे, भीम कोळी तसेच राजापूर दक्षता कमिटीच्या धनश्री मोरे यांना कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पाेहाेचून मदत केली. मृत महिलेचा मृतदेह रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला हाेता. राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन कुटुंबाची चौकशी केली. पुढील तपास राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांचे सहकारी करत आहेत