खेड न्यायालयाच्या आवारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न? प्रकृती गंभीर
By मनोज मुळ्ये | Published: September 1, 2022 07:16 PM2022-09-01T19:16:27+5:302022-09-01T19:17:34+5:30
हर्षल शिरोडकर खेड : येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, ...
हर्षल शिरोडकर
खेड : येथील न्यायालयाच्या आवारात एका महिलेने औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास खेडमध्ये घडली. छाया सावंत (४५, बौद्धवाडी, वेरळ, ता. खेड) असे या महिलेचे नाव आहे. कोर्टातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी हा प्रकार का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार एक सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास खेड न्यायालयाच्या आवारातील मंदिराशेजारी छाया सावंत यांनी औषधी गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्या बेशुद्ध पडल्या. त्यांनी कसल्या गोळ्या खाल्ल्या, ते समजू शकलेले नाही.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायालयीन कर्तव्यावर उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तेथे त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या महिलेने हा प्रकार का केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात उशिरापर्यंत कसल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती.