Ratnagiri Crime: नाेकरीचे आमिष दाखवत तरुणाला १२ लाखांचा गंडा, बनावट कागदपत्रेही पाठविली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:31 AM2023-02-10T11:31:04+5:302023-02-10T11:31:36+5:30
रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलत असल्याचे भासवून देऊड - चिंचवाडी (ता. रत्नागिरी) येथील तरुणाला नाेकरीचे आमिष दाखवत तब्बल १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ डिसेंबर २०२२ ते ३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला.
याप्रकरणी राहुल देवजी खापले (२२) याने फिर्याद दिली आहे. त्याच्या माेबाइलवर राेशनसिंग नावाच्या व्यक्तीचा फाेन आला. आपण नाेकरी डाॅट काॅम कंपनीचा अधिकारी बाेलत असल्याचे सांगून महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये नाेकरी लावताे, असे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या हितेश नावाच्या व्यक्तीच्या युनियन बॅंकेच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने २ लाख ३८ हजार ८८८ रुपये भरायला सांगितले.
कनक, कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर या व्यक्तींनी कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली. या सर्वांनी संगनमताने महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये डिप्लाेमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागात निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर विविध कंपनीतील विविध प्रक्रियेची कारण देत अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या कॅनरा बॅंकेतील खात्यात टप्प्या-टप्प्याने १० लाख ०१ हजार ८५१ रुपये भरण्यास सांगितले.
मात्र, नाेकरी लागल्याचा बनाव झाल्याचे लक्षात येताच आपली १२ लाख ४० हजार ७३९ रुपयांना फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पाेलिस स्थानकात फिर्याद दिली असून, राेशन सिंग, कनक कार्तिक, अभिषेक समंथा, राजेश्वर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
खाेटी कागदपत्रे
महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीमध्ये डिप्लाेमा इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी उत्पादन विभागात निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी माेबाइलद्वारे व ई-मेलद्वारे नाेकरी डाॅट काॅम व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या नावाचा वापर करून कागदपत्र पाठविण्यात आली. ही कागदपत्रे खाेटी असल्याचे नंतर समाेर आले.