Ratnagiri: संगमेश्वरात कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून तरुणावर तलवारीने वार, गंभीर जखमी

By अरुण आडिवरेकर | Published: April 19, 2023 11:25 AM2023-04-19T11:25:57+5:302023-04-19T11:41:30+5:30

या घटनेनंतर साखरपा गावात तणाव

A youth was stabbed with a sword during an argument during a kabaddi tournament in Ratnagiri | Ratnagiri: संगमेश्वरात कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून तरुणावर तलवारीने वार, गंभीर जखमी

Ratnagiri: संगमेश्वरात कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून तरुणावर तलवारीने वार, गंभीर जखमी

googlenewsNext

रत्नागिरी : कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा (ता. संगमेश्वर) येथील सागर वैद्य (वय-२२) या तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याची घटना मंगळवारी (दि.१८) घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी साखरपा दूरक्षेत्राला घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरा पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.

गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीच्या सामन्यादरम्यान त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तरुणाला बाजूला होण्याची काही प्रेक्षकांनी सूचना केली. यातूनच वादाला सुरुवात झाली. परंतु, त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला होता. मात्र संबंधित व्यक्तींच्या डोक्यात राग खदखदत होता.

ज्या तरुणाबद्दल राग होता, ज्याच्यावर हल्ला करायचा होता, तो तरुण जी गाडी चालवत होता तीच गाडी घेऊन सागर गेला होता. परंतु, ती व्यक्ती वादातील असल्याचा समज करून घेऊन १० जणांनी तलवारीने सागर वैद्य याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सागर जखमी अवस्थेत कोसळला. त्याला तात्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून, मोठा जमाव साखरपा दूरक्षेत्रावर धडकला होता. तर रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तेथील एका हॉटेलवर हल्ला झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर साखरपा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: A youth was stabbed with a sword during an argument during a kabaddi tournament in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.