अंगणवाड्यांच्या बालकांसाठी आधारकार्ड
By admin | Published: February 24, 2015 09:51 PM2015-02-24T21:51:24+5:302015-02-25T00:11:45+5:30
३१ मार्चच्या उद्दीष्टपूर्तीकडे लक्ष : शासनाच्या शोधमोहिमेत अडथळेच अडथळे...
रत्नागिरी : जिल्ह्याच्या अंगणवाड्यांमधील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे. सुमारे ९० हजार बालकांचे मार्चअखेर आधार कार्ड काढण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावयाचे आहे. मात्र, आधारकार्ड काढण्यासाठी केवळ ३५ मशिन्स असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आधारकार्डच्या कामाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आधारकार्ड हे आता प्रत्येक शासकीय, निमशासकीय व अन्य कामासाठी वापरण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने आधारकार्ड हे सक्तीचे केले आहे. विद्यार्थ्यांना आधारकार्ड काढता यावे, यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये आधारकार्डची मोहीम राबवण्यात आली होती.० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे आधारकार्ड असावे, यासाठी शासनाने मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे आधारकार्ड काढता यावे, म्हणून अंगणवाड्यांमध्ये कार्ड काढण्याचे काम शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आधारकार्ड काढण्यात येणाऱ्या बालकांचे त्याच्या आई किंवा वडिलांबरोबरचा एकत्रित छायाचित्र, आई किंवा वडिलांचा अंगठा आदींचा वापर हे करण्यात येतो. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत जिल्ह्यात २८९५ अंगणवाड्या व ११ बालगृह चालवण्यात येत आहेत. त्यामध्ये सुमारे ९० हजार बालके आहेत. या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम नुकतेच सुरुकरण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून केवळ ३५ मशिन्सचा वापर करण्यात येत आहे. आपला जिल्हा डोंगराळ व दुर्गम भागाचा असल्याने या भागातील अंगणवाड्यांपर्यंत पोहोचून आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी ३१ मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा उद्देश सफल होणे शक्य नाही. शासनाने आधारकार्ड काढण्यासाठीच्या मशिन्स वाढवणे आवश्यक आहे. ही मशिन्स वाढली तरच आधारकार्ड देण्याबाबतचे उद्दीष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)