आरे-वारे समुद्रात पाच पर्यटकांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:44 PM2018-06-03T23:44:36+5:302018-06-03T23:44:36+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे-वारे येथील समुद्रात बुडून बोरीवली येथे दोन कुटुंबांतील पाचजणांचा मृत्यू झाला. लिना मास्टर (वय ५२) या नशीब बलवत्तर म्हणून बचावल्या. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
आरे-वारे येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये केनेथ मास्टर (५४), मोनिका डिसुजा (४४), सनोमी डिसुजा (२२), रेंचर डिसुजा (१९) आणि मॅथ्यू डिसुजा (१८, सर्व मेधा कॉलनी, हॉलीक्रॉस रोड, शुभजीवन सर्कल, बोरिवली पश्चिम) यांचा बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली येथील डिसुजा आणि मास्टर कुटुुंब उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी दुपारी डिसुजा आणि मास्टर कुटुुंबातील सातजणांनी आरे-वारे समुद्र्रकिनारा गाठला. याठिकाणी मौजमजा करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. केवळ रिटा डिसुजा (७०) या पाण्याच्या भीतीने पाण्यात उतरल्या
नाहीत. त्यांनी काठावरच उभे राहणे पसंत केले.
पाण्याला ओहोटी असल्याने सहाहीजण पाण्यात खेचले गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने सहाहीजण पाण्यात बुडू लागले. यावेळी आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लिना मास्टर यांच्या हाताला किनाऱ्यानजीकचा दगड लागल्याने त्यांनी दगडाच्या मदतीने किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. उर्वरित पाचजण वाहून गेले.
स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामस्थ सागर शिवलकर, विवेक कनगुटकर, जीवन मयेकर, रूपेश वारेकर, महेश वारेकर यांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या पाचजणांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, पाण्याला ओहोटी असल्याने पाचहीजणांचे मृतदेह समुद्र्रातील दगडांमध्ये फसले होते. स्थानिक तरूणांनी मोठ्या जिकीरीने एकएक मृतदेह बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात बुडालेले पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारीदेखील तत्काळ मदतीसाठी दाखल झाले होते.
फाजील आत्मविश्वास
दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे समुद्र खवळलेला होता. डिसुजा कुटुंबीय समुद्रात उतरत असल्याचे पाहून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही हे सारेजण पाण्यात उतरले अन् ही दुर्घटना घडली. आरे-वारेतील स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे प्रशासनाने पाचहीजणांचे मृतदेह बाहेर काढले.