नारळाच्या काथ्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता : श्रीनिवास बिटलींगु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:27+5:302021-08-20T04:35:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : नारळाला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळ म्हणजे लक्ष्मीचेच रूप असून, वेगवेगळे उद्योग निर्माण करून रोजगार निर्माण करण्याची क्षमता या झाडात आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागाच्या क्वायर बोर्डाच्या उपक्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास बिटलींगु यांनी दिली.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचा समावेश असलेले क्वायर बोर्डाचे प्रादेशिक कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे असून, रत्नागिरी जिल्ह्यात क्वायरशी अर्थात नारळाच्या काथ्याशी निगडीत उद्योगांबाबत माहिती, उपलब्धता आणि संधीची माहिती घेण्यासाठी बिटलींगु रत्नागिरीत आले होते. त्यांच्यासमवेत क्वायर बोर्डाचे रत्नागिरीतील सदस्य बिपीन शिवलकर हेही उपस्थित होते. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतील महिला, तरुण किंवा समूहांना उद्यमशील बनवून रोजगार निर्माण करून देण्यासाठी क्वायर बोर्ड कार्यक्रम आखत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये क्वायर अर्थात नारळाच्या काथ्याची उपयुक्तता काय आहे, त्यातून उद्योग कसा आणि कोणता निर्माण होऊ शकतो, याची माहिती इथल्या इच्छुकांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी २ सप्टेंबरपासून रत्नागिरी, दापोली, गुहागर आणि लांजा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे बिटलींगु यांनी सांगितले.
नारळाच्या काथ्याचा वापर करून केवळ दोरखंड, पायपुसणे किंवा हॅन्डीक्राफ्टच्या वस्तूच बनवता येत नाहीत तर यापासून बनविण्यात येणारे कोकोपीठ खूप उपयुक्त आहे. त्यात पाणी साठवून ठवण्याची क्षमता असल्याने त्याचा शेतीसाठी खूप उपयोग होती. इमारत बांधण्यासाठी, नर्सरीसाठी याचा वापर होतो, अत्यंत कमी पैशात हे तयार करून नफा कमवता येतो. याशिवाय काथ्यापासून बनविण्यात येणारे भुवस्त्र बंधारे, रस्ते बांधकाम यासह जमिनीची धूप होण्यापासून वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी वापरता येत असल्याने त्याला मागणी असल्याचे श्रीनिवास बिटलींगु यांनी सांगितले.
आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या नारळाच्या झाडामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता आहे, त्यामुळे घरात फेकून दिली जाणारी नारळाची सोडणे आपल्याला उद्योग निर्माण करून देऊ शकतात. यासाठीच रत्नागिरीत बिपीन शिवलकर यांच्या सहकार्याने याबाबत जनजागृती करून जी नारळाची सोडणे फुकट जात आहेत, त्यातून उद्योग निर्माण करण्यासाठी इथल्या लोकांना प्रवृत्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.