साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:01+5:302021-06-10T04:22:01+5:30
चिपळूण : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या ...
चिपळूण : जिल्ह्यात १२ जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील व्यापाऱ्यांना दुकानातील साहित्य स्थलांतरित करण्यासाठी बुधवारी मुदत दिली होती. त्यानुसार बाजारपेठेतील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलवले.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ढगफुटीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या दृष्टीने तयारी चालवली आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने शहरासह नदीकाठच्या सुमारे चार गावांमधील १ हजार ६०८ नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बाजारपेठेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथील प्रशासनाने व्यापाऱ्यांना बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मुदत दिली होती. चिपळूण व्यापारी महासंघटनेनेही व्यापाऱ्यांना याविषयी आवाहन केले होते.
त्याप्रमाणे बाजारपेठेतील चिंचनाका, गांधी चौक, पानगल्ली, नाथ पै चौक, भेंडीनाका, नाईक कंपनी बाजारपूल, रंगोबा साबळे मार्गावरील व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले. त्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक दिवसांनी आपली दुकाने उघडली होती.