रत्नागिरीच्या कृषी प्रदर्शनात हापूस आंबा गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:48 AM2019-03-04T10:48:27+5:302019-03-04T10:50:58+5:30
रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
रत्नागिरी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा कृषी महोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला आहे. सलग पाच दिवसांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात कोकणात तसेच लगतच्या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री सुरू आहे. दरम्यान, मार्चमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करूनसुध्दा कोकणचा हापूस मात्र याठिकाणी विक्रीसाठी नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
कोकणच्या लाल मातीत स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, ब्रोकोली, सिमला मिरची, गहू, कांदा, बटाटा, मका, ऊस यासारखी पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या उन्नत्ती साधणारे शेतकरी आहेत. त्यामुळे पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये भाज्या, फळभाज्या, फळे, धान्य तसेच नाचणीपासून तयार केली जाणारी बिस्कीटे, सत्व उपलब्ध आहेत.
कऱ्हाडचा तूप घालून तयार केलेला गूळ तर रत्नागिरीकरांना भुरळ घालीत आहे. ओले काजूगर, काजू, विलायती काजू, ड्राय काजूगर, कच्ची करवंदे, आमरस, फणसजाम, कोकम सरबत, जांभूळ सरबत, आवळा सरबत याठिकाणी विक्रीला आहेत. मात्र, आंबा विक्रीसाठी नाही.
यावर्षी एकूणच आंब्याचे उत्पादन कमी झाले असून, निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेला आंबा तयार होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे. प्रदर्शनाच्या मुख्य स्टॉलवर कोकणात उत्पादित होणारी विविध फळे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी राजापूर येथील काझी नामक बागायतदारांच्या बागेतील चार आंबे प्रदर्शनापुरते ठेवण्यात आले असले तरी विक्रीसाठी आंबा उपलब्ध नाही.
अविट गोडीने भुरळ घालणारा यावर्षीच्या हंगामातील हापूस सध्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. याठिकाणी आंबा पेट्यांची संख्या कमी आहे. मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला असून, महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत.
यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी आंबा पाठविण्यात येत असला तरी गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अत्यल्प आहेच शिवाय दरही कमी आहे. सध्या आंबापेटीची विक्री १,५०० ते ४,००० रूपये दराने सुरू आहे.
थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. डिसेंबरपासून मोहोरावर असलेला थ्रीप्स कीटकनाशकांच्या फवारणीनंतरही नष्ट होत नाही. तुडतुड्याबरोबर कीडरोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीटकनाशकाच्या फवारणीनंतरही कीडीचा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव तसाच राहत असून, काही ठिकाणी मोहोर काळा पडला आहे.