शालेय पोषण अधिक्षक संतोष कठाळे यांच्याकडून गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:04 PM2019-07-03T12:04:07+5:302019-07-03T12:06:14+5:30
लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. लाखो रुपयांचा नियमबाह्य पध्दतीने वापर करण्यात आल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे.
रत्नागिरी : लांजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहारा अधिक्षक संतोष गोपीनाथ कठाळे यांनी सुमारे ११,२१,३२७ रुपयांची अनियमितता केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. लाखो रुपयांचा नियमबाह्य पध्दतीने वापर करण्यात आल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे.
संतोष कठाळे हे सध्या रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शालेय पोषण आहार अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. कठाळे यांच्या कार्यपध्दतीबद्दल रत्नागिरी पंचायत समितीच्या सभाही गाजल्या आहेत. कठाळे यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव, रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला होता.
लांजा पंचायत समितीत शालेय पोषण आहार अधिक्षक तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदावर कार्यरत असताना कठाळे यांनी ११ लाख २१ हजार ३२७ रुपयांचा सेल्फ चेक काढून कोणतेही अधिकार नसताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे पुढे आले आहे. धान्य कोठा/ भांडी खरेदीसाठी वित्त विभागाकडून २४८ शाळांना २,३९,३२० रुपये अनुदान वितरीत करणेसाठी देण्यात आले होते. हे अनुदान शाळांना वितरीत करण्याऐवजी शालेय पोषण आहाराच्या खात्यावर नियमबाह्यरित्या वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाजा तालुक्यातील ५५ शाळांच्या देयकांची ३,९३,२५० रुपये एवढी रक्कम शाळांना वाटप करण्याऐवजी अन्य खात्यात जमा करुन अनियमितता केल्याचे आढळूुन आले आहे. तसेच २,७०,१२६ रुपये एवढी रक्कम नियमबाह्य खात्यावर वर्ग करुन त्या रक्कमेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न करता ४ लाख ६९ हजार ६५० रुपये कठाळे यांनी ही रक्कम सेल्फ चेकने काढली. त्यानंतर या रक्कमेतून १ लाख १९ हजार रुपयांची अनुदान नसतानाही स्टेशनरी खरेदी केली. मात्र, ही स्टेशनरी खरेदीनंतर प्राप्त झाल्यावर त्याची नोंद साठा रजिस्टरलाही घेण्यात आलेली नसल्याने चौकशीमध्ये दिसून आले आहे.
शिक्षण विभागाचे कोणतेही आदेश नसताना ठसाळे यांनी शिक्षकांची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रबाबत कार्यशाळा घेण्यासाठी ५० हजार रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम अनुदान नसतानाही खर्च केल्याने हा खर्च संशयास्पद असल्याचे चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अशा प्रकारे लाखो रुपयांचा खर्चामध्ये अनियमितता आढळून आल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. कठाळे यांनी आर्थिक अनियमितता केल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी कठाळे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कठाळेंच्या जिल्हा बदलीचे आदेश
रत्नागिरी पंचायत समितमध्ये शालेय पोषण आहार अधिक्षक कठाळे यांचे प्रकरण गाजत असतानाच त्यांनी लांजा तालुक्यात कार्यरत असताना आर्थिक कामकाज करताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे चौकशीमध्ये पुढे आले आहे. त्यातच कठाळे यांची अन्य जिल्ह्यामध्ये बदलीचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना सोडणार कि त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.