संगमेश्वर तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:49+5:302021-04-05T04:27:49+5:30
फाेटाे ४ च्या देवरुखला साखरपा आरोग्य केंद्रांतर्गत माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लोकमत न्यूज नेटवर्क ...
फाेटाे ४ च्या देवरुखला
साखरपा आरोग्य केंद्रांतर्गत माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : जिल्ह्यात सध्या दिवसागणिक कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ लक्षात घेता, आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये ३० मार्चपर्यंत १३ लसीकरण केंद्रांतर्गत ६४६९ जणांना पहिला डोस, तर १४९७ जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एस. एस. सोनावणे व आरोग्य विस्तार अधिकारी एस. पी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य यंत्रणेनेही या लसीकरण मोहिमेला वेग घेतला आहे. तालुक्यात एकूण १३ लसीकरण केंद्रांतून ३० रोजीपर्यंत ६४६९ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये १६७५ जणांनी कोव्हॅक्सिन, तर ४७९४ जणांनी कोव्हिशिल्डचा डोस घेतला. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये १४९७ जणांना कोव्हिशिल्डचा डोस देण्यात आला. या लसीकरण मोहिमेत हेल्थकेअर वर्कर्सना, फ्रंटलाईन वर्कर्सना, ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधींसह नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६६ जणांना पहिला डोस, ८१ जणांना दुसरा डोस, कोंडउमरे केंद्रांतर्गत १०० जणांना पहिला डोस, फुणगूसमध्ये २१६ जणांना पहिला डोस, तर दुसरा डोस ४ जणांना देण्यात आला. धामापूर केंद्रांतर्गत ३६१ जणांना पहिला डोस, तर दुसरा डोस १९ जणांना दिला. बुरंबीमध्ये २९० जणांनी पहिला डोस, साखरपा आरोग्य केंद्रांत १४१९ जणांनी पहिला डोस, तर २८९ जणांनी दुसऱ्या डोसचा लाभ घेतला. सायले केंद्रांतर्गत २६६ जणांना पहिला डोस, तर दुसरा डोस ७३, देवरुखमध्ये १४० जणांना पहिला डोस, तर १० जणांना दुसरा डोस देण्यात आला. माखजन केंद्रांतर्गत २५६ जणांनी पहिला डोस, तर १६ जणांनी दुसरा डोस घेतला. कडवई केंद्रांतर्गत ३२६ जणांनी पहिला डोस, तर ५१ जणांनी दुसरा डोस, निवेखुर्दमध्ये १२० जणांनी पहिला डोस, संगमेश्वर रुग्णालयामध्ये १७७८ जणांनी पहिला डोस, तर ६७१ जणांनी दुसरा डोस घेतला, तसेच देवरुख ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रांतर्गत १०३१ जणांना पहिला डोस, तर २८३ जणांनी दुसऱ्या डोसचा लाभ घेतला आहे.