भात लागवडीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:18+5:302021-07-11T04:22:18+5:30
जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक ...
जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येत असून १२ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लावण्यात येते. आतापर्यत ३३ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. ३०१६ हेक्टर क्षेत्रावर नागली, १७४ हेक्टर क्षेत्रावर वरी लागवड करण्यात आली आहे.
पारंपरिक पध्दतीने भात लागवड करण्यापूर्वी रोपे काढून लागवड केली जाते. त्यामध्ये सुधारीत लागवड पध्दत, चारसूत्री लागवड, ‘श्री’ (एस.आर.आय) लागवड पध्दतीचा शेतकरी अवलंब करीत आहेत. यावर्षी पेरण्यांची कामे वेळेवर पूर्ण झाल्याने लागवडीचीही कामे शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्याने कामे रेंगाळली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रावर प्राधान्याने लागवड करण्यात येत होती. मात्र डोंगराळ, वरकस क्षेत्रावरील भात लागवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय कडाक्याच्या उन्हामुळे लागवड केलेली रोपे पिवळी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहेत. शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. लागवडीची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी सामूहिक लागवडीकडे शेतकरी प्रयत्न करीत आहेत. लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, यासाठी पंप तर नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यात येत आहेत. अद्याप निम्म्या क्षेत्रावरील भात तसेच नाचणी लागवड शिल्लक असून वेळेवर लागवडीची कामे पूर्ण करण्याकडे कल आहे.
भाड्याने पंप, ट्रॅक्टरचा वापर
पावसाने दडी मारल्याने शेतकरी लागवडीसाठी भाड्याने पाण्याचा पंप तसेच ट्रॅक्टर घेत आहेत. कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न असला तरी इंधन दर वाढीमुळे भाड्याचे दरही वाढले आहेत. पंपासाठी तासाला १५० ते २०० रूपये तर नांगरणीसाठी ट्रॅक्टरचे भाडे ताशी ३५० रूपये आकारले जात आहे. ट्रॅक्टरमुळे नांगरणी चांगल्या प्रकारची व कमी वेळेत पूर्ण होत आहे. पाऊस पुन्हा सुरू झाला असल्याने पंपाची मागणी कमी झाली आहे. परंतु नांगरणीसाठी ट्रॅक्टरला विशेष मागणी होत आहे.
खताची उपलब्धता वेळेवर
खरीप हंगामासाठी १३ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले होते पैकी आतापर्यंत साडेदहा हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. खताअभावी शेतीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध करून देण्यात आली होती. रासायनिक खतांमध्ये युरियासह मिश्र खतांना विशेष मागणी असून यावर्षी खताची उपलब्धता वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उर्वरित खतांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार असून त्याचा वापर फळबागांसाठी करण्यात येत आहे. भात लागवडीनंतर फळ बागेतील कामांना प्रारंभ होणार आहे.
पीक विमा योजना
शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर केली असून जिल्ह्यातील भात व नागली पिकाचा या योजनेतंर्गत समावेश केला आहे. भातासाठी एका हेक्टरला ४५ हजार ५०० रुपये तर नाचणीसाठी २० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम जाहीर केली आहे. हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हातभार मिळावा यासाठी योजना जाहीर केली आहे.
सामूहिक लागवड
शेतीची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी मजुरांची उपलब्धता होणे गरजेचे आहे. मात्र युवा पिढीमध्ये शेती कामांबाबत निरुत्साह जाणवत आहे. हंगामात वेळेवर लागवड पूर्ण करण्यासाठी सामूहिक भातलागवडीकडे प्रयत्न वाढला आहे. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे लागवडीची कामे उरकण्यात येत आहेत. येत्या दोन आठवड्यात जिल्ह्यातील भात लागवडीची कामे उरकण्याची शक्यता आहे.