लांज्यात लसीकरणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:23+5:302021-05-13T04:32:23+5:30
लांजा : कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी अहोरात्र काम करणारी तालुका आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणासाठी सरसावली असून, ...
लांजा : कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी अहोरात्र काम करणारी तालुका आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीकरणासाठी सरसावली असून, दि. ११ मेपर्यंत तालुक्यात ११ हजार ७३ लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. लसीचा अनियमित पुरवठा, बुकिंगमधील सावळागोंधळ व अपुरे मनुष्यबळ या समस्यांवर मात करत हे लसीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हाच खूप मोठा पर्याय आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा लसीकरणावर विशेष भर देत आहे. तालुक्यात दि. ११ मेपर्यंत कोवॅक्सिनचा पहिला डोस ३ हजार १३८ लोकांना देण्यात आला, तर ६०९ लोकांना दुसरा डोस असे एकूण ३ हजार ७४७ डोसचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड या लसीचा ७ हजार ९४० लोकांना पहिला डोस देण्यात आला, तर १ हजार ४९५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तालुक्यातील ११ हजार ७८ लोकांना कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे दोन्ही डोस मिळून एकूण १३ हजार १८२ डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
लस पुरवठ्यातील अनियमितता, लसीच्या बुकिंगमधील सावळागोंधळ व अपुरे मनुष्यबळ या समस्यांचा आरोग्य यंत्रणेला सामना करावा लागत आहे. या समस्यांवर मात करत हे लसीकरण करण्यात आले आहे. लसीच्या पुरवठ्यातील गोंधळ दूर झाल्यास लसीकरणाचा वेग सहज वाढवता येईल, असा विश्वास आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.