जिल्हा परिषद शाळांच्या रिक्त पदांचे ग्रहण सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:30 AM2021-05-23T04:30:15+5:302021-05-23T04:30:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही. या शाळांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे लागलेले ग्रहण अजूनही सुटलेले नाही. या शाळांमध्ये ९१४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातच शिक्षक बदल्यांना तात्पुरती स्थगिती मिळालेली असली तरी ती उठल्यावर अनेक शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलीने अन्य जिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
शिक्षक भरती २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असतानाही शासनाकडून रिक्त पदे भरण्यास चालढकल केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणारी मुले ही ग्रामीण भागातील गरीब परिस्थितीतील असतात. त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला नाही तर त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरल्यास इतर शिक्षकांवरील ताण कमी होऊन तेही उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवू शकतील.
मोफत शिक्षण, आहार, पुस्तके अशी ओळख जिल्हा परिषद शाळांची झालेली आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणही उत्तम प्रकारे मिळत असतानाही विद्यार्थ्यांचा लोंढा आजही इंग्रजी शाळांकडे जाताना दिसतो. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव असल्याने कार्यरत शिक्षकांवरही कामाचा ताण वाढत आहे. मात्र, गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षकावर भर देण्यात आली होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी जिल्ह्याला ७३६३ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ६८६९ आणि उर्दू माध्यमाच्या ४९४ शिक्षकांच्या पदांचा समावेश आहे. मराठी माध्यमाचे ८२० शिक्षक आणि उर्दू माध्यमाच्या ९४ शिक्षकांची पदे अशी एकूण ९१४ पदे रिक्त आहेत. त्यातच १० टक्के शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हाअंतर्गत बदलीसाठी ३०० शिक्षकांनी ना हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र, प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यास या शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांना खो बसणार आहे.
----------------
पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न
एकीकडे शिक्षण विभाग प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच जेथे विद्यार्थी शिकतात त्या शाळांना शिक्षक देण्याची मेहरबानी करीत नसल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकून पसंतीस उतरू लागल्या असताना रिक्त पदांचे ग्रहण मात्र गुणवत्तेवर परिणाम करीत आहे.
-----------------
जिल्ह्यातील एकूण प्राथमिक शाळा - २५७४
शिक्षकांची मंजूर पदे - ७३६३ (मराठी माध्यम- ६८६९)
(उर्दू माध्यम- ४९४)
शिक्षकांची रिक्त पदे- ९१४ (मराठी माध्यम- ८२०)
(उर्दू माध्यम- ९४)