परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:22 PM2024-11-10T12:22:43+5:302024-11-10T12:23:21+5:30
सलग दोन अपघातांमुळे परशुराम घाटातील अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे.
चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या गर्डरवर ट्रक आढळून अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली होती. त्यापाठोपाठ रविवारी सकाळी पुन्हा भीषण अपघात झाला. एसटी बस, कंटेनर, कार, व दुचाकीची एकमेकांना धडक लागून हा अपघात घडला. यामध्ये एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. सलग दोन अपघातांमुळे परशुराम घाटातील अपघातांची मालिका सुरूच राहिली आहे.
परशुराम घाटात शनिवारी सकाळी ट्रकच्या अपघाताची घटना घडली होती. डोंगरातील भराव खाली आल्याने तेथे रस्त्याच्या कडेलाच सुरक्षेसाठी सिमेंटचे गर्डर ठेवण्यात आले होते. मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला ट्रक या गर्डरवर आदळल्याने अपघात झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजता त्याच ठिकाणी एसटी कंटेनर कार व दुचाकी मध्ये अपघात झाला. मिरज दापोली ही बस परशुराम घाटातून खेडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.
या अपघातात एसटीच्या दर्शनी भागात मोठे नुकसान झाले असून एसटी चालक जखमी झाला आहे. तसेच एसटीतील प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी नाव घेतले आहे. या अपघातामुळे परशुराम घाटात पुन्हा एकदा वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीत अनेक वाहने अडकून पडली होती. मात्र पोलिसांनी या ठिकाणी अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन एकेरी वाहतूक सुरू केली आहे.