चिपळुणातील उड्डाणपूलाचे पिलर तोडताना घडला अपघात

By संदीप बांद्रे | Published: July 5, 2024 08:46 PM2024-07-05T20:46:21+5:302024-07-05T20:46:32+5:30

क्रेनचा रोप तुटल्याने दोन कामगार जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी

accident happened while breaking the flyover pillar in Chiplun | चिपळुणातील उड्डाणपूलाचे पिलर तोडताना घडला अपघात

चिपळुणातील उड्डाणपूलाचे पिलर तोडताना घडला अपघात

चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणा अंतर्गत येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे पिलर तोडण्याचे काम सुरू आहे. क्रेनच्या सहाय्याने पिलरची एक बाजू उतरवताना रोप तुटला आणि त्यावर उभे असलेल्या तीन कामगारांपैकी दोघेजण २० फुटावरून खाली कोसळले. हे दोन्ही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली.

चिपळुणातील उड्डाणपूलाचे तीन वर्षांपासून सातत्याने काम सुरू आहे. परंतु या पुलाच्या कामात सुरुवातीपासून अडचणी येत आहेत. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून आता पावसाळ्यातही काम सुरु ठेवण्यात आले आहे. मात्र १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा बहाद्दूरशेखनाका येथे काही भाग कोसळला होता.  पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यावर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या समितीच्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. यामध्ये पूर्वीचे पिलर मधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिलर उभारले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आधीच्या पिलरच्या अतिरिक्त असलेल्या बाजू तोडल्या जात आहेत.

गेले महिनाभर हे तोंडाफोडीचे काम सुरू आहे. भर पावसात अत्यंत घाईघाईने हे काम केले जात आहे. शुक्रवारी एका पिलरची कापलेली एक बाजू क्रेनच्या साहाय्याने खाली उतरवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी रोपच्या सहाय्याने क्रेनचे हूक पिलरच्या तोडलेल्या भागाला जोडले होते. परंतु त्यातील एक हूक निसटला आणि पिलरचा तोडलेला भाग अचानक कलंडला. त्याच क्षणी त्यावर उभे असलेले दोन कामगार २० फुटावरून खाली कोसळले. तसेच एका कामगाराने दुसरा रोप पकडल्यामुळे बचावला. जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना डोक्याला, कंबरेला व पायाला  दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णवाहिका मागवून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहने थांबविण्यात आली. त्यामुळे येथे वाहनांची लांबचलांब रांग लागून वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

Web Title: accident happened while breaking the flyover pillar in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.