प्रशासकीय पेचातील रस्ते अपघातांचे द्याेतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:43+5:302021-07-31T04:31:43+5:30
प्रशांत सुर्वे/ मंडणगड : रस्ता आहे पण सोईपेक्षा अपघातांची भीती अधिक अशी स्थिती सध्या तालुक्यातील सर्वच मार्गांची झाली आहे. ...
प्रशांत सुर्वे/
मंडणगड : रस्ता आहे पण सोईपेक्षा अपघातांची भीती अधिक अशी स्थिती सध्या तालुक्यातील सर्वच मार्गांची झाली आहे. रस्ता आहे पण त्यापेक्षा खड्डे अधिक, रस्त्यावर झाडीचे वाढते प्रमाण अपघात वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. तालुक्यातील वाडी वस्ती जोडण्यासाठी १५८ रस्ते अस्तित्वात आहेत. या सुमारे ४५० किलाेमीटर रस्त्यांनी तालुका जोडला गेलेला आहे. असे असले तरी हे रस्ते सध्या अपघातांचे द्याेतक बनत आहेत.
तालुक्यातील दळणवळण सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम असे दोन विभाग काम करत आहेत. रस्त्याला गटार नाही त्यामुळे पावसाचे सर्व पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्त्याची धूप माेठ्या प्रमाणावर होत आहे. मुळातच दिलेल्या निकषाप्रमाणे कामे न करणे हे इथले ठेकेदाराचे मूळ उद्देश जपत रस्ते विकासकामे होत असतात त्यातच शासनाकडे रस्ते देखभाल दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे रस्ते कामगार नसल्याने ही कामे तालुक्यात कुठेच होत नाहीत. त्यातच कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षांमध्ये अशाप्रकारे देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने निधीच दिलेला नसल्याने तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. असे असले तरी विविध हेडखाली अधिकारी किमान निधी आणून महत्त्वाचे असणारे मार्गावरील खड्डे भरण्याचे काम करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशा रस्त्यांचे वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम अन्य संस्थेकडे देण्याची व्यवस्था असून, त्याच्या माध्यमातून काही रस्त्याचे देखभाल दुरुस्ती केली जात आहे. ही स्थिती तरी दोन वर्षांपासूनची असली तरी त्याआधीची रस्त्यांची स्थिती फार काही वेगळी नव्हती. मुळात रस्ते निर्मिती करताना देण्यात आलेल्या निकषांप्रमाणे कोणीही ठेकेदार आणि अधिकारी काम करत नाही वा करून घेत नाही त्यामुळे रस्ते झाले पण नाले नाहीत आणि रस्ते कामगार रस्त्यांवर कमी आणि कार्यालयात अधिकवेळ कामावर असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
---------------------------
केवळ तीन रस्ता कामगार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणारे रस्ते आणि त्यांची लांबी व सद्य:स्थिती १४ रस्ते असून, त्याची लांबी १९३ किलाेमीटर आहे. या रस्त्यांच्या लांबीनुसार या रस्त्यावरची देखभाल दुरुस्तीकरिता ५० रस्ता कामगार असणे अपेक्षित आहेत. मात्र, सद्यस्थितीत केवळ तीन रस्ता कामगार आहेत. रस्ता नूतनीकरण केल्यानंतर दोन ते तीन वर्षांकरिता त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे असते असे सुमारे ५० किलाेमीटर रस्ते आहेत.
--------------------------
जिल्हा परिषदेचा एकही रस्ता कामगार नाही
जिल्हा परिषदेकडे १४० ग्रामीण मार्ग असून, अस्तित्वात असलेल्याची लांबी १६४ किलाेमीटर आहे. इतर जिल्हा मार्ग ४ असून, त्याची लांबी ६४ किलाेमीटर आहे. या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीकरिता २० रस्ता कामगारांची आवश्यकता असताना याठिकाणी एकही रस्ता कामगार नाही.